पुणे - 'पोलिसांमध्ये कणखरता नक्कीच असायला पाहीजे, त्याचा लोकांच्या सुरक्षेसाठी चांगला उपयोग झाला पाहीजे, परंतु हाच कणखरपणा जनतेला त्रासदायक होऊ नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.' असे राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पाषाण येथील पोलिस संशोधन केंद्रातर्फे आयोजित व भारतीय पोलिस सेवेतील निवृत्त अधिकारी वसंत के.सराफ लिखित "ऑन पोलिस ऍन्ड पोलिसींग' या पुस्तकाचे मंगळवारी पांडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी प्रशिक्षण व खास पथकाचे अतिरीक्त पोलिस महासंचालक संजयकुमार, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सराफ, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अतिरीक्त पोलिस महासंचालक रितेशकुमार, पोलिस संशोधन केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशकुमार उपस्थित होते.
पांडे म्हणाले, 'पोलिसांना खात्यात अनेक चढ-उतार व चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत काम करताना पोलिसांना भावनिक होऊन चालत नाही. तर तिथे कणखरपण असणे गरजेचे आहे. परंतु हाच कणखरपणा जनतेला त्रासदायक ठरेल, असे होऊ नये, याकडे पोलिसांनी लक्ष दिले पाहीजे. पोलिसांनी कायम लोकाभिमुख कामालाच प्राधान्य दिले पाहीजे. त्यासाठी पोलिस हवालदारापासून ते भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना खास प्रशिक्षण दिलेले असते.' सराफ यांचे पुस्तक पोलिसांसाठी दिशादर्शक ठरेल, असे सांगून पांडे यांनी मी नवखा अधिकारी असताना अनेक अडचणी यायच्या, त्यावेळी सराफ सरांकडून आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळाल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
संजयकुमार म्हणाले, 'आपल्याकडे वापरण्यात येणारा पोलिस कायदा हा ब्रिटीशकालीन आहे. त्यामध्ये काळानुरूप सुधारणा करण्याची गरज आहे. कायदा राबविताना कायम सर्वसामान्य नागरीकांना डोळ्यांसमोर ठेवून त्याचा उपयोग केला पाहीजे.'
'ऑन पोलिस ऍन्ड पोलिसींग' या पुस्तकामध्ये पोलिस खात्यासंबंधीचे अनेक पैलु उलगडण्यात आले आहेत. त्यामध्ये मला आलेल्या वेगवेगळ्या अनुभवाचाही समावेश केला आहे. त्यामुळेच या पुस्तकाचा नव्या दमाच्या पोलिस अधिकाऱ्यांना चांगला उपयोग होईल, असे सराफ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.