पुणे - पतीला झालेला गंभीर अपघात व त्यानंतर आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्याने तिची सुखी संसाराची स्वप्नं क्षणार्धात उद्ध्वस्त झाली. मात्र, चार लेकरांकडे पाहून तिने स्वतःला सावरले. पतीच्या उपचाराचा खर्च व मुलांच्या पालनपोषणासाठी तिने धुणीभांडी करण्याचा निर्णय घेतला. 18 वर्षांपासून ती अशी कष्टाची कामे उपसत मुलांना शिकवित आहे. मुलांनीही तिच्या कष्टाचं चीज केलं असून, चारही मुलं उच्चशिक्षित आहेत. त्यातील एका मुलीने अभियांत्रिकीची (आयटी) पदवी पूर्ण केली असून, मुलगा मॅकेनिकच्या तृतीय वर्षाला आहे.
धनकवडीतील गंगा प्रकाश दुधाणे यांच्या जिद्द, कष्ट आणि प्रयत्नांची ही यशोगाथा. प्रतिकूल परिस्थितीतही मुले उत्तमरीत्या शिकली, याचे समाधान या माउलीच्या डोळ्यांत आहे; तर आईच्या कष्टाची आम्हाला जाणीव असून, तिला वाईट वाटेल असेही कोणतेही कृत्य आमच्या हातून घडणार नाही, असा मुलांचा निर्धार आहे.
पती प्रकाश दुधाणे यांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता. सिंहगड रस्त्यावर 2002 मध्ये त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. रूबी हॉलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
त्यावेळी दहा लाख रुपये खर्च झाला. मात्र, डॉक्टरांनी प्रयत्न करूनही प्रकाश अंथरुणाला खिळून राहिले. पतीच्या या अवस्थेने गंगा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी त्यांची थोरली मुलगी पूनम चौथीत, तर धाकटा मुलगा प्रसाद पहिलीत शिकत होता. मात्र, मुलांकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरले. त्या अशिक्षित असल्याने त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता फारच कमी होती. मग त्यांनी घरोघरी जाऊन धुणीभांडी करण्याचा निर्णय घेतला. आधी घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने त्यांना सुरुवातीला लोकांच्या घरी जाऊन धुणीभांडी करायचा संकोच वाटायचा. सुरुवातीचा महिनाभर त्या सतत रडत होत्या. मात्र, थोड्याच दिवसांत त्या खंबीर बनल्या.
सुरुवातीला त्या 14 घरची धुणीभांडी करू लागल्या. नंतर त्यांनी स्वयंपाकाची कामेही करण्यास सुरुवात केली. त्यांची थोरली मुलगी पूनम व दोन नंबरची सोनाली यांनी उच्च शिक्षण घेतले असून, त्यांचे लग्न झाले आहे. दोघीही आपापल्या संसारात सुखी आहेत.
अनेकदा उपचार व मुलांचे शिक्षण व लग्न यासाठी त्यांनी बचत गट व इतर ठिकाणांवरून कर्जे काढली आहेत. धुणीभांडी करूनच त्यांनी ही कर्जे फेडली आहेत. उपचार सुरू असतानाच 2018 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.
आईची स्वप्ने पूर्ण करणार
आपल्या मुलांनी खूप शिकावे, असा गंगा यांचा निर्धार आहे. त्यासाठी कितीही कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे. तीन नंबरची मुलगी गौरीने अभियांत्रिकीची (आयटी) पदवी पूर्ण केली आहे. सध्या ती पुढील शिक्षण घेत असून, खासगी क्लासही घेत आहे. तसेच नोकरीसाठी प्रयत्नशील आहे. मुलगा प्रसाद हा मॅकेनिकच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. आमच्या शिक्षणासाठी आई खडतर कष्ट करत असल्याचे आम्ही लहानपणापासून पाहत आहोत. त्यामुळे तिची स्वप्ने पूर्ण करणे, हेच आमचे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया या मुलांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.