मेंढपाळ कुटुंबातील विठ्ठल किसन कोळेकर या युवकाला कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली नव्हती. आर्थिक परिस्थितीही अत्यंत बेताची होती. मात्र, केवळ आपल्या आई-वडिलांनी वेळोवेळी पुरविलेले बळ आणि काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीच्या जोरावर आज विठ्ठल सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता झाला आहे.
या प्रवासात त्याला पाच वर्षांत सात वेळा अपयश आले, परंतु अलीकडच्या आठ महिन्यांत तब्बल सात स्पर्धा परीक्षांमध्ये सलग यश मिळवत त्याने आपल्या यशाला सप्तरंगी साज चढविला आहे.
या दांपत्याने आपल्या तीनही मुलींचे दहावी-बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पळशी (ता. बारामती) येथील किसन व विजया कोळेकर या दांपत्याला तीन मुली आणि विठ्ठल हा एकटा मुलगा आहे.
दोन एकर जिराईत शेती अपुरी असल्याने विजया शेती करतात आणि किसन हे बिगारीकाम, गवंडीकाम करून संसाराची जबाबदारी पेलत आहेत. दोघेही अल्पशिक्षित आहेत, मात्र खडतर परिस्थितीतही विठ्ठलचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पळशी येथे आणि माध्यमिक शिक्षण अनंतराव पवार विद्यालयात पूर्ण झाले. सुरुवातीपासूनच आपल्या शाळेत तो गुणवंत विद्यार्थी राहिला होता.
कित्येक अपयश आले तरी आई-वडिलांनी शब्दानेही टोकले नाही. याउलट 'करत राहा, प्रयत्न सोडू नको', असे ते नेहमी म्हणत होते. कोरोनानंतर कोणतीही सुट्टी न घेता मी सातत्यपूर्ण अभ्यास केला. सण- समारंभ, उत्सव, जत्रा, मोबाईल अशा गोष्टींमध्ये वेळ घालवला नाही. अखेर यश मिळालेच. या यशानंतर वडिलांऐवजी त्यांनी जोडलेल्या मित्रांनी व ग्रामस्थांनीच गुलाल उधळून आनंद साजरा केला.विठ्ठल कोळेकर
वाघोलीतील जेएसपीएम महाविद्यालयात त्याने बी.ई. सिव्हिलची पदवी घेतली. त्याचा शैक्षणिक भार पेलण्यासाठी वडील गवंडीकामातूनच सेंट्रोंग शिकले. विठ्ठलने पदवीनंतर नोकरीऐवजी स्पर्धा परिक्षेकडे वळण्याचे ठरविले. मात्र यासाठी त्याला कोणत्याही खासगी शिकवणीचा खर्च पेलवणारा नव्हता.
स्पर्धा परिक्षेच्या मार्गाची कोणतीही माहिती नसताना तो स्वयंप्रेरणेतूनच अभ्यासाला लागला. एमपीएससीमार्फत झालेल्या इंजिनिअरिंग सर्विसेसच्या २०१९, २०२० व २०२१ या तीन वर्षांत दिलेल्या तीन परिक्षांमध्ये त्याला चांगले यश मिळाले, परंतु मुलाखतीच्या टप्प्यात त्याला अपयश मिळाले. कोरोनाच्या काळात यशाच्या अपेक्षेने थोडा गहाळ राहिला. परिणामी पुढील मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या बांधकाम अभियंता पदाच्या परीक्षांमध्ये तसेच नगरअभियंता परिक्षेतही त्याला अपयश आले.
शेवटी निराश होऊन स्पर्धा परिक्षा सोडून देण्याचा विचार त्याने केला, पण वडिलांनी त्याला हार पत्करू दिली नाही. वडिलांच्या पाठिंब्याने २०२२पासून पुन्हा अधिक जीव ओतून कृष्णाली अभ्यासिकेत त्याने अभ्यास केला. सात वेळा आलेले अपयश पाठीमागे टाकत २०२३मध्ये त्याने सरळसेवेच्या सलग सात परिक्षा दिल्या.
अखेर या खडतर प्रवासानंतर २६ जानेवारी २०२४च्या पहिल्या निकालातून तो सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक झाला. फेब्रुवारीमध्ये पनवेल महानगरपालिकेचा कनिष्ठ अभियंता बनला.
पुढे जलसंपदा विभागात तसेच पुणे जिल्हा परिषदेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपद पटकाविले. त्यानंतर नगर अभियंतापदालाही गवसणी घातली आणि आता मात्र रायगड आणि सातारा या दोन जिल्हा परिषदांमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून त्याची निवड झाली. आता विठ्ठल सातारा जिल्हा परिषदेत रुजूदेखील झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.