पिंपरी - शहरात निर्माण होणारा कचरा रोज गोळा करून मोशी डेपोमध्ये नेला जात असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा एकीकडे, तर दुसरीकडे बहुतांश ठिकाणी कचराकुंड्या तुडुंब भरलेल्या असून काही ठिकाणी तो रस्त्याच्या कडेलाच फेकून दिल्याचे वास्तव सोमवारी (ता. २२) ‘सकाळ’ने शहरात केलेल्या पाहणीत आढळले. त्यामुळे नेमके चुकते कोण? दुर्गंधी व अस्वच्छतेला जबाबदार कोण? तसेच स्वच्छता अभियानाचाच ‘कचरा’ झाला का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छ ठेवून देशात स्वच्छ शहराचा बहुमान मिळविण्याचे स्वप्न महापालिका प्रशासन पाहात आहे. त्यासाठी शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली. मोशी कचरा डेपोत कचरा नेला जातो. त्यासाठी रोज दोन पाळ्यांमध्ये कामगारांची नियुक्ती केली आहे. सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत कचरा उचलण्याचे व त्याची वाहतूक करण्याचे काम सुरू आहे. तरीही शहरातील रस्त्यांवर कचऱ्याची समस्या गांभीर्याने दिसते आहे.
कचरा संकलन पद्धती
शहराच्या निम्म्या भागातील घरोघरचा कचरा गोळा करून मोशी डेपोत नेण्याचे काम बीव्हीजी क्षितिज वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला दिले आहे. शहराच्या निम्म्या भागातील कचरा महापालिका स्वतःच्या कामगारांमार्फत उचलते. घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी छोटी वाहने असून, त्याद्वारे वॉर्डांमधील कचरा संकलन केंद्रावर नेला जातो. तेथून तो ४.५ घनमीटर क्षमतेच्या कंटेनर्समध्ये साठविला जातो. त्या कंटेनर्समधील कचरा कॉम्पॅक्टर वाहनामार्फंत मोशी कचरा डेपो येथे नेला जातो.
घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी मनुष्यबळ व कचरा वाहतूक करणारी वाहने पुरेशी आहेत. काही वाहने जुनी झालेली असल्याने ते नादुरुस्त होतात. त्यामुळे काही वेळा कचऱ्याची समस्या निर्माण होत असते. मात्र, पर्यायी व्यवस्था करून कचरा उचलून नेला जातो. तसे आदेश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
ओल्या कचऱ्याला प्राधान्य
निगडी - आकुर्डी प्राधिकरणातही सध्या कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. कचरा वेळेवर उचलला जात नाही, परिणामी ढीग साचतात. तर, प्रभागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो. ओला कचरा प्राधान्याने उचलला जातो, अशी माहिती अ प्रभागाचे आरोग्य अधिकारी महादेव शिंदे यांनी दिली.
हे अाहे वास्तव
घरोघरचा कचरा गोळा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या कमी
कचरा वेचक कामगार, वाहनचालक, मुकादमाची अपुरी संख्या
काही वाहने खूपच जुनी असून वारंवार नादुरुस्त होत असल्याने अडथळे
काही ठिकाणी कचराकुंड्या दिवसभरात तीन वेळा भरतात, त्यातील कचरा केवळ एका वेळेसच नेला जात असल्याने कुंड्या भरलेल्या दिसतात
काही नागरिक कुंड्यांऐवजी उघड्यावरच कचरा टाकतात
उपनगरांतही समस्या गंभीर
भोसरी - येथील लांडेवाडी चौक ते एसटी महामंडळाच्या चालक प्रशिक्षण केंद्रापर्यंत पुणे-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आलेला आहे. एमआयडीसीत रस्त्यांच्या कडेला रसायनमिश्रीत कचरा टाकला जात आहे. एमआयडीसीतही कचरा टाकलेला आढळला.
कचऱ्याचे साम्राज्य
वाल्हेकरवाडी - बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंतामणी चौक, स्पाइन रोड, शिवाजी चौक, गुरुद्वारा आदी परिसरात कचरा रस्त्यावरच टाकला जातो. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. कचरागाडी अनियमित असते.
दोन शिफ्टमध्ये संकलन
जुनी सांगवी - घंटागाड्या अपुऱ्या असल्याने कचरा साचून पर्यायाने रस्त्यावर येतो. सध्या सात गाड्यांद्वारे कचरा संकलनाचे काम दोन शिफ्टमध्ये सुरू आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणची कचऱ्याची समस्या सुटली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अशीच व्यवस्था ममतानगर, मुळानगर, पवारनगर, नदी किनारचा रस्ता, आनंदनगर येथेही आहे.
पदाधिकाऱ्यांचे प्रभागही कचरामय
चिखली - नादुरुस्त वाहने, मनुष्यबळाची कमतरता यामुळे महापौर, सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता यांच्या प्रभागात कचरा समस्या सुटलेली नाही. फ क्षेत्रीय कार्यालयाच्या कक्षेत कचरा संकलनासाठी किमान ५० वाहनांची गरज आहे. सध्या केवळ ३८ वाहने आहेत. कचरा कुंड्या नेण्यासाठी आठ वाहने आहेत. मात्र, ही वाहने जुनी असल्याने अनेकदा नादुरुस्त असतात. त्यातच कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे कचरा कुंड्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचतात.
रुपीनगर, तळवडेत दुर्गंधी
रावेत - रुपीनगर, तळवडे, रावेत परिसरातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. घंटागाड्या सात आठ दिवस येत नाहीत. चौकातील कचराकुंड्या गायब आहेत. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकतात.
कचरा उचलत नाहीत
मोशी - मोशी गावठाणासह वाड्यावस्त्या व प्राधिकरण भागातील कचरा उचललाच जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. प्राधिकरण पेठ क्रमांक चार, सहा, नऊ, स्पाइन रस्ता, राजा शिवछत्रपती चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, केंद्रीय विहारामागील बाजू, इंद्रायणी नदीकिनारा, जिल्हा मध्यवर्ती सुविधा केंद्राचा परिसर आदी भागांत अनेक दिवसांपासून कचरा साठला आहे.
जुनी सांगवीत दोन कचरा कुंड्या आहेत. मात्र, अनेकदा त्या तुडुंब भरल्यानंतर त्यातील कचरा रस्त्यावर येतो. वेळीच कचरा उचलल्यास कचरा रस्त्यावर येणार नाही.
- विशाल सांगळे, नागरिक, जुनी सांगवी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.