- गैय्या संस्कृत, गायिका (संस्कृत श्लोकांचे संगीताद्वारे सादरीकरण)
‘संस्कृत’ आणि ‘संगीत’ ही भारताची प्राचीन ओळख आहे. संगीतबद्ध झालेले श्लोक आणि मंत्र यांचा आवाज कानावर पडताच आपल्या आंतरिक भावांमध्येही बदल घडतो. इतकेच नाही, तर एक सकारात्मक ऊर्जा आपले शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यास मदत करते. अशाच सकारात्मक ऊर्जेची अनुभूती ‘संस्कृत मंत्रोच्चारा’च्या (संस्कृत चॅन्टिंग) सादरीकरणातून पुणेकरांना ‘स्वास्थ्यम्’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे...
(Suhana Sakal swasthyam 2023)
‘संस्कृत’मधील श्लोक आणि मंत्र यांचा अर्थ आपल्या जीवनाला दिशा देणारा आहे. ही भाषा प्राचीन असली, तरी तिचे महत्त्व आजही मोलाचे आहे. संस्कृत भाषेविषयी मला असलेले प्रेम माझ्या पालकांमुळे निर्माण झाले. मी जन्माने ब्रिटिश असले, तरी आत्म्याने भारतीय आहे. पालकांमुळे भारताच्या अनोख्या संस्कृतीबाबत लहान वयातच समजत गेले. माझे आई-वडील भारतात आले, तेव्हा त्यांना येथील संस्कृतीविषयी अधिक माहिती मिळत गेली.
ते भगवद्गीता, उपनिषद आणि वेदिक साहित्याचे वाचन करायचे, त्यामुळे त्यांना संस्कृत भाषेचे चांगलेच ज्ञान होते. त्यात मी सुद्धा ही प्राचीन दैवी भाषा शिकावी अशी त्यांची इच्छा होती. त्यातूनच मलाही शाळेत संस्कृत भाषेचे शिक्षण मिळाले. संस्कृत भाषेशी माझी ओळख तसे तर, अवघ्या चार वर्षांची असतानाच झाली.
हळूहळू मलाही रामायण, महाभारत, भगवद्गीता अशा ग्रंथांबाबत समजत गेले. त्यामुळे अध्यात्माची आवड निर्माण होत गेली. त्याचबरोबर लहान वयातच ध्यान व संस्कृत मंत्रांच्या उच्चाराला सुरुवात केली. यामुळे मानसिक आरोग्य देखील तंदुरुस्त राहण्यास मदत मिळत गेली. संस्कृत मंत्र आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
दरम्यान, मी संगीत आणि संस्कृतमध्ये पदवी घेतली. तसेच, संगीताच्या माध्यमातून संस्कृत श्लोकांचे भगवद्गीता आदींचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली. हे आपल्या आंतरिक भावनांना आनंदमय करण्यास मदत करते. सकारात्मक दृष्टिकोन, समाधान, आणि सहकार्याची भावना यासाठी मन परिवर्तनाच्या प्रवासामध्ये ‘संस्कृत’मधील श्लोक आणि मंत्र यांचा संगीतमय उच्चार पूरक ठरतो.
आजच्या काळात शारीरिक व मानसिक आरोग्य हे सर्वांसाठी प्राधान्याचे ठरत आहे. त्यामध्ये संस्कृतच्या ध्वनीचा नाद मोलाची भूमिका बजावू शकतो. एकाग्रता वाढविण्यासाठी व मानसिक शांततेसाठी हा नाद अत्यंत उपयुक्त ठरतो. कोणतेही ध्येय साध्य करायचे असल्यास मन स्थिर राहणे आवश्यक असते. मात्र, बऱ्याचदा मनाची स्थिरता राखणे किंवा विचारांवर ताबा मिळविणे कठीण जाते.
अशातच संस्कृतच्या ध्वनीचा नाद व संस्कृतमधील मंत्र आपल्याला मनाची स्थिरता स्थापित करण्यास मदत करतात. शारीरिक आरोग्याबाबत बोलायचे झाल्यास, जिथे औषधोपचार पोहचू शकत नाही तेथे, ध्वनीचा संचार होत असतो. तसेच, मानसिक आरोग्य स्वस्थ असल्यासच शारीरिक आरोग्यही स्वस्थ राहू शकते.
अनेकदा लोकांना त्यांच्या नित्यक्रमातून बाहेर येत काही वेगळे करण्याची इच्छा नसते. कित्येकांना मोठ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन लोकांना भेटणे आवडत नाही. मात्र, अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यावर तुम्ही विविध लोकांना भेटाल किंवा असे काही शब्द ऐकाल, ज्यामुळे तुमच्या जीवनाचा सार बदलू शकतो. तुम्हाला नवी उमेद मिळू शकते, ज्याचा जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
त्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. लोकांना चांगल्या संगतीत आणून त्यांचे जीवन हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगले बनवण्याची क्षमता ‘स्वास्थ्यम्’मध्ये आहे. लोकांना प्रेरणा देऊ शकणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात घेऊन येणे ‘स्वास्थ्यम्’द्वारे साध्य होणार आहे. कोणी आपल्या आयुष्यात संघर्ष किंवा एखाद्या समस्येमुळे काळजी करत असतील, त्यांना स्वतःची मदत करण्याची प्रेरणा यातून मिळेल.
‘स्वस्थ्यम्’ एक असे व्यासपीठ ठरत आहे, जिथे नागरिकांना एकत्रित आणत त्यांना प्रेरणा मिळते. ज्या प्रमाणे मेणबत्ती पेटवून त्याद्वारे अंधकार दूर केला जातो, त्या प्रमाणे ‘स्वास्थ्यम्’मुळे यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणेचा प्रकाश निर्माण होईल. तो त्यांच्या आयुष्यात धैर्य आणि आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त असेल, ज्याचा त्यांना भविष्यातही फायदा होईल.
भारतीय संस्कृती मुळात सत्यम, शिवम आणि सुंदरमवर आधारित आहे. आणि ते संस्कृतच्या ध्वनीच्या नादात कायम आहे. या कार्यक्रमात मी उपस्थित असलेल्या लोकांसोबत संस्कृत मंत्रोच्चार (संस्कृत चॅन्टिंग) करणार आहे. देवी, देवतांशी जोडली जाणाऱ्या बऱ्याच गाण्यांचा व स्तोत्रांचाही यात समावेश असेल. त्याचबरोबर ‘स्वास्थ्यम्’मध्ये सहभागी झालेल्यांना भजन व कीर्तनाचा आनंद घेता येईल.
या संपूर्ण एक तासाच्या कार्यक्रमात आम्ही हिंदी, इंग्रजी अशा कोणत्याही भाषेचा वापर न करता संपूर्णतः संस्कृत आणि त्याच्या ध्वनीवर लक्ष केंद्रित करू. ज्यामुळे या ध्वनीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल.
(शब्दांकन - अक्षता पवार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.