पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडवून आणलेले रॅकेट उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला (Pune Police Cyber Crime Branch) यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक केली आहे. दोघांनी मिळून ३५० परीक्षार्थींकडून तीन कोटी ८५ लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फेत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आला आहे.
सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. नाशिक) आणि स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींना प्रथमवर्ग न्यायलयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांनी त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहे. तर यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप (वय ४८, रा. भोसरी) आणि मनोज शिवाजी डोंगरे (वय ४५ रा. लातूर) यांना ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेले तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर, प्रीतिश देशमुख, अंकुश हरकळ, संतोष हरकळ, अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोरे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून चार कोटी ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात यापूर्वी अटक आरोपी घोलप आणि डोंगरे यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना गुरुवारी (ता. ६) न्यायालयात हजर केले. आरोपी घोलप याचा तुकाराम सुपे आणि डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याबरोबर मोबाईलवर चॅटिंग झाल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपी घोलप हा सुपेकर याचा चालक असल्याने त्याने अनेक परिक्षार्थींकडून पैसे उकळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याबाबत त्याच्याकडे तपास सुरू आहे. आरोपी डोंगरे याने प्रीतिश देशमुख याच्याकडून रक्कम स्वीकारली असून ती कोणासाठी स्वीकारली याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला.
सुरंजित पाटीलची भूमिका :
पाटील याने २०१९ साली झालेल्या टीईटी परीक्षेला बसलेल्या २०० परिक्षार्थींकडून प्रत्येकी एक लाख १० हजार रुपये घेतले. या परीक्षार्थींची यादी व दोन कोटी ३५ लाख रूपयाची रक्कम जमवली.
स्वप्नील पाटीलची भूमिका :
स्वप्नील पाटील याने देखील २०१९ साली झालेल्या परिक्षेतील १५० परिक्षार्थींकडून प्रत्येकी एक लाख १० हजार रुपये घेतले. त्याने एकूण एक कोटी ५० लाख रुपये जमा केले.
जमा झालेली रक्कम संतोष आणि अंकुश हरकळ यांना दिली :
दोन्ही दोघांनी ३५० परिक्षार्थींचे तीन कोटी ८५ लाख रुपये आरोपी संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना दिल्याचे कबूल केले आहे. सुरंजित आणि स्वप्नील या दोघा आरोपींनी संतोष आणि अंकुश हरकळ यांच्याशी संपर्क साधला तसेच टीईटी परिक्षा आणि २०१९ बसलेल्या परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी नियोजित कट रचला आहे, असे ॲड. जाधव यांनी युक्तीवादादरम्यान सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.