दौंड, ता. २७ : दौंड न्यायालयातील सोने स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका वकिलाने शहरातील एका छायाचित्रकाराची तब्बल पंधरा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. लिलावात प्रतितोळा पंचवीस हजार रुपयांप्रमाणे सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.
सज्जन मारुती काकडे (रा. नवगिरे वस्ती, दौंड) या छायाचित्रकाराच्या फिर्यादीवरून अॅड. सनी अजित बलदोटा (रा. गजानन सोसायटी, दौंड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सज्जन काकडे यांचा फोटो स्टूडिओ असून, पक्षकारांचे छायाचित्र काढण्यासाठी अॅड. सनी बलदोटा तेथे येत असल्याने परिचय होता. जून २०२३ मध्ये सनी बलदोटा यांनी दौंड न्यायालयात जप्त केलेल्या सोन्याचा लिलाव होणार असल्याची माहिती देत त्या लिलावात पंचवीस हजार प्रति तोळा, या दराने स्वस्तात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तसेच लिलावाची पावती मिळणार असल्याचे सांगत रक्कम बॅंक खात्यात जमा करण्यास सांगितले.
आमिषाला बळी पडून सज्जन काकडे यांनी कर्ज काढून आणि नातेवाईक व मित्रपरिवाराकडून उसनवारी करून एकूण पंधरा लाख रुपये सनी बलदोटा यांनी सांगितलेल्या बॅंक खात्यात जमा केले. दरम्यान, लिलावाविषयी विचारणा करताच टाळाटाळ केल्याने सज्जन काकडे यांनी चौकशी केली असता अशाप्रकारचा लिलाव होत नसल्याची माहिती मिळाली. दिलेली रक्कम परत मागताच सनी बलदोटा यांनी एका नातेवाईकाच्या नावाने बॅंकेत खाते असलेला पंधरा लाख रुपयांचा धनादेश ६ ऑगस्ट २०२३ रोजी दिला. परंतु सदर बॅंक खात्यामध्ये रक्कमच शिल्लक नसल्याचे स्पष्ट झाले.
फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सज्जन काकडे यांनी २६ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात सनी बलदोटा यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.