पुणे

सुरक्षित पर्यटनाचा पॅटर्न ‘अंधारबन जंगल ट्रेक’

CD

मकरंद ढमाले : सकाळ वृत्तसेवा
माले, ता. ९ : मुळशी तालुक्‍याच्‍या पश्चिम पट्ट्यातील ‘अंधारबन जंगल ट्रेक’साठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.
वनखात्‍याने केलेल्‍या सुरक्षिततेच्‍या उपायांमुळे हा ट्रेक पर्यटकांच्‍या पसंतीस पडत असून, वनखात्‍याने सुधागड अभयारण्‍याचे अधिकारी, कर्मचारी यांच्‍या माध्‍यमातून पर्यटकांच्‍या सुरक्षिततेसाठी केलेल्‍या सकारात्‍मक प्रयत्‍नांना पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

असा आहे ट्रेक
सुधागड अभयारण्‍य परिसरात मोडणाऱ्या अंधारबनची सुरवात पिंपरी (ता. मुळशी) गावातून होते. येथे सुरवातीलाच कुंडलिका व्‍हॅलीचा खोल दरीतून वर येणारे धुके, ढग, पावसाचा अनुभव घेता येतो. कुंडलिका व्‍हॅली व्‍‍ह्यू पॉइंट, हिरवा शालू नेसलेले दाट जंगल, खोल दरी, धबधबे, ओढे, हवा आणि धुक्‍याचा खेळ, निसर्गाचा अनोखे नयनरम्‍य नजारे डोळ्यांचे पारणे फेडतात. जंगल ट्रेकच्‍या मध्‍यम कठीण प्रकारात मोडणाऱ्या ट्रेकचे अंतर अंदाजे १३- १४ किलोमीटर पायवाट आहे. चालण्‍याच्‍या गतीनुसार पूर्ण ट्रेकसाठी सामान्‍यतः सहा तास लागतात. खडकाळ पट्टे, जंगलातून जाणाऱ्या चढ उताराच्‍या वाटा आहेत. मध्‍यम कठीण प्रकारात मोडणारा असला तरी नवशिके, हौशी, अनुभवी ट्रेकर्ससाठी सूचनांचे पालन करत योग्‍य आहे. शारीरिक क्षमतेनुसार पर्यटक अंधारबनाच्‍या आसनवाडी, हिरडी, भीरा येथे जाऊ शकतात. अथवा कोणत्‍याही टप्‍प्‍यावरून परत फिरू शकतात.

पर्यटकांची नोंदणी
कुंडलिका व्‍हॅली, अंधारबन प्रवेशद्वार या दोन ठिकाणी प्रवेशासाठी चेक पोस्‍ट उभारण्‍यात आले आहेत. वनखात्‍याकडून शुल्‍क घेऊन पावती देण्‍यात येते. या पावतीवर कुंडलिका व्‍हॅली, अंधारबन जंगल ट्रेक करता येतो. पहिल्‍यांदा पर्यटकांची नोंदणी करण्‍यात येते. ग्रुप लिडर, प्रमुख व्‍यक्‍ती, एकूण व्‍यक्‍ती अंधारबन ट्रेक कुठपर्यंत करणार आहेत, याची माहिती घेण्‍यात येते. काही पर्यटक आसनवाडी- घुटके, भीरा येथून बाहेर पडतात, त्‍याचीही नोंद घेतली जाते. परतीच्‍या वेळी यातील सर्व पर्यटक माघारी आलेत किंवा नाहीत, याची मोजणी केली जाते. शनिवार, रविवार, सुट्टीच्‍या दिवशी
सरासरी एक ते दीड हजार पर्यटक अंधारबनात येतात.

रेलिंग, बाक
वनखात्‍याच्‍यावतीने पर्यटकांच्‍या स्‍वागतासाठी सुंदर कमान उभारली आहे. कुंडलिका व्‍हॅलीचा नजारा पाहताना
सुरक्षिततेसाठी दरीच्‍या कडेने रेलिंग बसविण्‍यात आले आहेत. दरीमध्‍ये दाट धुके असल्‍यास धुक्‍याचा पडदा दूर होऊन
दरीचा नजारा पाहण्‍यासाठी वाट बघावी लागते. यासाठी ठिकठिकाणी बाकडे बसविण्‍यात आले आहेत. यामुळे कुंडलिका
व्‍हॅलीचा आनंद निवांत बसून घेता येतो. सरदार नावजी बलकवडे यांच्‍या समाधीजवळील वाघजाई मंदिरापासून दरीच्‍या कडेने ठिकठिकाणी रेलिंग बसविल्याने पर्यटकांना आधार मिळत आहेत.

ओढ्यांवर लोखंडी पूल
‘अंधारबन ट्रेक’मध्‍ये माकड्याचा ओढा, बोकड्याचा ओढा, असे दोन मोठे ओढे लागतात. पावसाळ्यात या ओढ्यांना मोठे पाणी येते. मागील काही वर्षांमध्‍ये अंधारबनातील ओढा ओलांडताना घसरून पडल्‍याने दरीत पडून जीव गमवावा लागल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. या दोन्‍ही ओढ्यांवर लोखंडी पूल तयार केल्‍याने पर्यटकांना सुरक्षित पर्याय उपलब्‍ध झाला आहे. त्यामुळे मागील वर्षात एकही अपघात झालेला नाही.

सीसीटीव्हीची ‘नजर’
या परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवण्‍यात आले असून, त्‍याद्वारेही परिसरावर लक्ष ठेवले जाते. काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्‍याने वॉकी- टॉकीचे दोन संचांच्‍या माध्‍यमातून परिस्थितीची माहिती संदेश दिले जातात. अपघात झाल्‍यास प्राथमिक उपचार किट, स्‍ट्रेचर उपलब्‍ध आहे.

सौर ऊर्जेवरील पथदिवे
अंधारबन जंगल परिसरात पावसाळ्यात कमी उजेडाचे वातावरण असते. तसेच रस्‍ता चुकल्‍यास मार्ग लक्षात येण्‍यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे २० पथदिवे लावण्‍यात आले आहेत.

वनकर्मचारी, मदतनीस
सुधागड अभयारण्‍याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास तरसे, वनपाल सागर भोसले, वनरक्षक रावसाहेब राठोड,
स्‍थानिक पुरुष-महिला मदतनीस, असे सुमारे १२-१३ कर्मचारी पर्यटकांच्‍या मदतीस उपलब्‍ध असतात.

प्रशिक्षित गाइड
वनखात्‍याने स्‍थानिक तरुणांना गार्डडचे प्रशिक्षण दिले आहे. भौगोलिक परिस्थिती, धोके, सुरक्षितता, नैसर्गिक परिस्थिती
पाहून निर्णय घेणे, असे प्रशिक्षण मिळालेले सुमारे २५ प्रशिक्षित गाइड उपलब्‍ध झाले आहेत.

प्रसाधनगृह, स्‍वच्‍छता
कुंडलिका व्‍हॅली व्ह्यू पॉइंट येथे महिला व पुरुषांसाठी स्‍वतंत्र प्रसाधन गृहाची सोय केली आहे. त्‍यामुळे अशा दुर्गम
ठिकाणी पर्यटकांची होणारी कुचंबणा टळली आहे. ठिकठिकाणी कचरा टाकण्‍यासाठी कचरा पेट्या ठेवल्‍या
आहेत. तसेच, शुक्रवार, सोमवार या दिवशी व्‍हॅली व्ह्यू पॉइंट व अंधारबन जंगल ट्रेकचा कचरा वेचून परिसर
स्‍वच्‍छ केला जातो.

रोजगारात वाढ, गावांचा विकास
ग्राम परिस्थितीय विकास समिती पिंपरीच्‍या माध्‍यमातून सर्व व्‍यवहार केले जातात. उपलब्‍ध निधीतून पिंपरी, घुटके, गोठे, आसनवाडी, हिरडी आदी परिसरामध्‍ये विविध विकासकामे केली जातात. अंधारबनमुळे स्‍थानिकांनी हॉटेल सुरु केली आहे. त्यांतून चांगले आर्थिक उत्‍पन्‍न मिळत आहे. गाइड, अंधारबनमध्‍ये सुरक्षा, स्‍वच्‍छता कर्मचारी म्‍हणून रोजगार मिळत आहे. कुंडलिका व्‍हॅली पॉइंटजवळ खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावल्‍यामुळेही रोजगार मिळत आहे.

प्रिवेडिंग शुटींगसाठी पसंती
विवाहपूर्व फोटोग्राफी, व्हिडीओसाठी कुंडलिका व्‍हॅली जवळ मोठया प्रमाणात लग्‍न ठरलेली जोडप्‍यांची पसंती मिळत आहे. खोल दरी, धुके, हिरवे गालिचे, मुग्‍ध करणारी निसर्गदृश्‍यांमुळे छायाचित्रकार कुंडलिका व्‍हॅलीला प्राधान्‍य देतात. त्‍यांना शुल्‍क आकारून परवानगी देण्‍यात येते व उत्‍पन्‍नातही भर पडते.

कितीही सुरक्षितता बाळगली तर अपवादात्‍मक, अनिश्चित परिस्थितीमुळे अपघात होऊ शकतात. परंतु, ते टाळण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचे दिसून येत आहेत. अर्थात हे बदल टप्‍प्‍या टप्‍प्‍याने झाले असून सुमारे पन्‍नास लाखांचा खर्च करण्‍यात आला आहे. पर्यटनस्‍थळ विकसित करून पर्यटकांना आनंद, सुरक्षितता, सुविधा, तर स्‍थानिकांना रोजगार मिळवून देणारा वनखात्‍याचा हा उपक्रम आहे.
- विकास तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुधागड अभयारण्‍य

अंधारबन ट्रेक व मदतीसाठी संपर्क
सागर भोसले, वनपाल
मो. क्र. ९२८४४ ६१०४२, ९०११७ ९०८१६.

अंधारबनातील सुविधा
ट्रेकची लांबी- १३-१४ किलोमीटर पायवाट
प्रशिक्षित गाइड- २५
पर्यटकांच्या मदतीला वनकर्मचारी- १२-१३
सौरपथदिवे- २०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT