शिरूर - अण्णापूर (ता. शिरूर) हे गाव गैरप्रकारांमुळे पूर्वी पोलिस दप्तरीत ‘हिट लिस्ट’वर होते. हा दाग पुसण्यासाठी गावातील तरुणांनी एकत्र येत चांगल्या कामातून गावाची नवी ओळख तयार करत आहेत. याच गावातील तब्बल १२ जणांनी यंदा पोलिस भरतीत यश मिळवले आहे. त्यामुळे त्या तरुणांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
शिरूर-पाबळ ररस्त्यावरील अण्णापूर हे गाव साधारण तीन हजार लोकवस्तीचे असून गाव कायमच भानगडींनी चर्चेत असायचे. वादावादी, मारामाऱ्या हे इथले नित्याचे खेळ झाले होते. मात्र, काही जाणत्या मंडळींनी युवाशक्तीला जागृत केले आणि प्रबोधनातून प्रेरणा घेत तरुणांनी देशसेवेचे ब्रीद घेतले. गेल्या पाच वर्षांत या गावातून तब्बल १२ जण फौजेत दाखल झाले असून, चार मुलींसह १६ जण पोलिसात भरती झाले आहेत. यंदा, तर सर्व ‘रेकॉर्ड’ मोडत तब्बल १२ जण एकाच वेळी पोलिस सेवेसाठी निवडले गेले. त्यात तीन मुलींचाही समावेश आहे. तरुणांच्या या यशाने ग्रामस्थांनाही आनंद झाला असून, गावात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते नूतन पोलिसांचा फेटा बांधून व शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला.
एसटी चालकाची मुलगी असलेली निकीता सुनील फलके मुंबई शहर पोलिसांत भरती झाली. गौरी रामदास कुरंदळे हिची पुणे ग्रामीण पोलिस दलात निवड झाली असून, तीच्या इतर दोघी बहिणीही उच्च शिक्षित आहेत. कोरोनाकाळात पितृछत्र हरपल्याने तिचे पोलिस बनण्याचे स्वप्न धूसर झाले होते. परंतु दोन बहिणींसह आई आशा तीच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या.
गतवर्षी झालेल्या अटीतटीच्या कुस्ती स्पर्धेत शिरूर केसरीच्या उपविजेतेपदापर्यंत धडक मारलेल्या पैलवान आकाश नबाजी पवार याची मुंबई पोलिसात निवड झाली आहे. मुलगा पोलिस व्हावा, हे स्वप्न पाहिलेल्या आणि त्यासाठी सर्वतोपरी खस्ता खाणाऱ्या वेळप्रसंगी इतरांच्या शेतावर काम करणाऱ्या रभाजी रासकर व अलका रासकर यांच्या कष्टाचे त्यांचा मुलगा ऋषिकेश याने पांग फेडले आहेत. पोलिस गणवेशात मुलाला पाहण्याचे आई-वडीलांचे स्वप्न त्याने प्रत्यक्षात आणले आहे.
छोट्या-मोठ्या कामधंद्याच्या निमित्ताने वडील कायमच बाहेर असताना आई बताबाई यांनी सातत्याने दिलेल्या प्रेरणेतून व पैलवान असलेला बंधू पाठीशी उभा राहिल्याने नितीन मोहन चौगुले यानेही पोलिस होण्याचे ध्येय गाठले. घरची केवळ दीड एकर शेती कसून प्रपंचाचा गाडा कसाबसा हाकणाऱ्या कुऱ्हे कुटुंबातील रवींद्र दादाभाऊ कुऱ्हे याने मीरा भाईंदर पोलिसात स्थान मिळवून यशाला गवसणी घातली. ज्ञानेश्वर दशरथ लाळगे यानेही जिद्दीने पुणे शहर पोलिसात स्थान मिळविले.
अखरेच्या संधीचे केले सोने
पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती झालेल्या आकाश मोहन येवले याची यापूर्वी भारतीय सैन्यदलात निवड झाली होती. तथापि, तेथील खडतर ट्रेनिंगदरम्यान, पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला घरचा रस्ता धरावा लागला. पायाचे दुखणे घेऊन बरीच वर्षे काढल्यावर वयही वाढत गेले. दरम्यान, त्याने यंदा पोलिस भरतीसाठी मेहनत घेतली आणि अखेरच्या संधीत त्याची ही मेहनत फळाला आली.
अर्धवट राहिलेले स्वप्न पुन्हा साकारले
मेजर म्हणूनच परिचित असलेल्या अंबादास काळे या माजी सैनिकाने सैन्यदलात भरती होण्यापूर्वी पोलिस दलात जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, केवळ काही गुणांच्या कमतरतेमुळे त्यांचे पोलिस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले होते. पुढे ते सैन्यदलात भरती झाले. भारतीय सैन्यदलात १८ वर्षे सेवा बजावल्यानंतर दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. वर्षभर कसेतरी काढले पण घरी बसून राहणे त्यांच्या स्वभावाला मानवणारे नव्हते. गतवर्षी झालेल्या पोलिस भरतीच्या परीक्षेस ते पूर्ण तयारीनिशी सामोरे गेले आणि वीस वर्षांपूर्वी अर्धवट राहिलेले स्वप्न त्यांनी जिद्दीने यंदा साकारले.
बहिण-भावांच्या यशाचे गावालाही अप्रूप
यापूर्वीच पोलिसमध्ये भरती होऊन सेवा बजावणाऱ्या नीलम पवार यांच्या पाठोपाठ त्यांच्या बहिण-भावानेही पोलिस सेवा पत्करली आहे. मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत पुनम हनुमंत पवार व आदित्य हनुमंत पवार या भावंडांनीही मुंबई पोलिसात स्थान मिळविले. तिघेही भावंडे पोलिस झाल्याचे कौतुक आई-वडीलांना तर आहेच, परंतु गावालाही हे अप्रूप वाटत आहे. माधुरी संपत रासकर हिच्यापाठोपाठ तिचा भाऊ किरण संपत रासकरही पोलिस झाल्याने रासकर वस्तीसह अवघ्या गावाला आनंद झाला आहे.
अण्णापूर गावचा लौकिक काही फारसा चांगला नव्हता. गावात रोजगाराचे साधन नसल्याने तरुण पिढी काहीशी दिशाहीन होती. परंतु, युवाशक्ती संघटित होऊन अण्णापूर गावचा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, असा इतिहास रचला आहे.
- किरण झंजाड, सरपंच, अण्णापूर, (ता. शिरूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.