शिरूर - शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत असलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे सत्तेच्या मागे अजित पवार यांच्याबरोबर आणि ‘दादांचा माणूस’ म्हणूनच ओळख असलेले आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत गेल्याने शिरूर-हवेली आणि आंबेगाव-शिरूर या दोन्ही मतदारसंघातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत.
त्यातच शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शपथ घेताना अजित पवार यांच्याबरोबर, नंतर शरद पवार यांच्या बाजूने गेल्यामुळे ‘शिरूर’ हे नाव राज्यस्तरीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झळकत आहे.
वळसे पाटील हे ‘पवारसाहेबांचा’ तर अशोक पवार हे ‘दादांचा’ माणूस म्हणून ओळखले जातात. मात्र, वळसे पाटील हे अजित पवार यांच्या बंडाच्या पहिल्याच झटक्यात त्यांच्यासोबत शपथ घेऊन थेट सत्तेच्या सोपानावर चढले; तर राजकारणात कायमच उच्चपदाची महत्वाकांक्षा बाळगणारे मात्र या राज्यस्तरीय घडामोडींच्या वेळी काहीसे तळ्यात-मळ्यात, अशी भूमिका असलेले अशोक पवार अखेर शरद पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे राजकीय निरीक्षकांबरोबर शिरूर, हवेली व आंबेगाव तालुक्यांतील जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या शपथविधीवेळी त्यांच्यासमवेत होते. भाजप नेत्यांशी त्यांची दिलखुलास वर्तणूकही टीव्हीच्या पडद्यावर अनेकांनी पाहिली. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी शरद पवार यांची पाठराखण केली. तसे स्टेट्स व त्या समर्थनार्थ त्यांच्याच मालिकेतील शिवकालीन संदर्भही त्यांनी दिले.
तिसऱ्या दिवशी तर थेट खासदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका जाहीर केली. त्यांची ही उद्विग्नता शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला भावली. मात्र, त्यांनी मुंबईच्या मेळाव्यात केलेल्या घणाघाती भाषणाने ही राजकीय चाल असल्याचेच सर्वसामान्य जनतेने जाणले.
वळसे पाटील यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील सारी राजकीय गणितेच बदलून गेली आहेत. अत्यंत मितभाषी, निष्ठावान व कुठल्याही वादात न अडकणारे आणि कुठलेही वादग्रस्त विधान वा कृती शिताफीने टाळणारे, अशी ख्याती असलेल्या वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्या या आक्रमक व टोकाच्या निर्णयात त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय पटलाबरोबरच सर्वसामान्य जनतेतूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तसेच, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व आमदारांपेक्षा अशोक पवार यांचे अजित पवार यांच्याकडे काकणभर अधिक वजन होते. असे असताना आणि बहुतांश आमदारांनी त्यांचे बंड उचलून धरले असताना एकमेव अशोक पवार यांनी वेगळी वाट धरली. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातही त्याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
अशोक पवार यांच्या राजकीय जडणघडणीत शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांचा वाटा अधिक आहे. विधानसभेची उमेदवारी असो की इतर पदाधिकारी निवडीचा विषय, अनेक आणीबाणीच्या प्रसंगात दोन पर्याय समोर आल्यास अजित पवार यांनी अशोक पवार यांच्याच पारड्यात आपल्या पसंतीचे मत टाकले. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडात ते त्यांच्यासोबतच जातील, हे गृहितच धरले जात होते.
शपथविधीवेळीही ते त्यांच्यासमवेत असल्याने या गृहितकावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, मुंबईत झालेल्या शरद पवार व अजित पवार यांच्या शक्तिप्रदर्शनात त्यांनी शरद पवार यांच्या सभेला हजेरी लावली. शिवाय, ‘शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देताना आम्हाला चुकीची माहिती देऊन सह्या घेतल्या गेल्या,’ असेही प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणाला धक्का बसला.
पदाधिकाऱ्यांचे मौन
आमदारांनी निष्ठा जपत हे पाऊल उचलले असले; तरी त्यांच्या या धाडसी निर्णयाबद्दल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले. तालुक्यातील सर्व महत्त्वाच्या संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत, त्या आमदार पवार यांची राजकीय जडणघडण अजित पवार यांच्यामार्फत अधिकतर झाली आहे. असे असताना त्यांना डावलून वेगळा निर्णय घेतल्याने इतर संस्थांचे प्रतिनिधित्व करणारांची तोंडे बंद झाली आहेत.
भाजपच्या इच्छुकांना उकळ्या
अजित पवार यांनी बंड करीत भाजपशी संधान साधल्याने त्यांचे तालुक्यातील समर्थकही त्यांच्यासोबत जाऊन आपल्याला स्पर्धक म्हणून उभे राहतील, या शक्यतेने भाजपच्या स्थानिक नेते-कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला होता. या नव्या समीकरणाने भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली होती.
भविष्यातील राजकारणात राष्ट्रवादीची भाजपशी युती झाल्यास आणि त्यांनी विधानसभा निवडणूक एकत्रित लढविल्यास ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल, या शक्यतेने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजपच्या इच्छुकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. मात्र, अशोक पवार यांनी शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्याने भाजप इच्छुकांचा जीव भांड्यात पडला. मोठा अडथळा दूर झाल्याने भाजप इच्छुकांबरोबरच पदाधिकाऱ्यांना आतापासूनच उकळ्या फुटू लागल्या आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
दिलीप वळसे पाटील व अशोक पवार यांच्यातील द्वंद्व सर्वश्रृत असून, राजकीय पटलावर कायमच पक्षांतर्गत शीतयुद्ध चालू असल्याचे अनेक राजकीय घडामोडींवरून यापूर्वी दिसून आले आहे. शिरूर तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव मतदारसंघाला जोडल्याने वळसे पाटील यांची शिरूर तालुक्यातील विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती असायची. अशावेळी अशोक पवार यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जायचे.
अजितदादांचा माणूस असला तरी आपण थेट पवारसाहेबांशी कनेक्ट असल्याच्या भूमिकेतून वळसे पाटील गट अशोक पवार यांना कधीच भाव देत नव्हता, तर वळसे पाटलांच्या मतदारसंघाला लागून असलेल्या शिरूर शहरात व इतरत्र दणक्यात कार्यक्रम घेताना अशोक पवार समर्थक हे केवळ पवारसाहेब, अजितदादा व सुप्रिया सुळे यांचेच फोटो वापरायचे. वळसे पाटील मंत्री झाल्यानंतरही यात फारसा फरक पडला नव्हता.
‘माझा नेता एकच अजितदादा’ असे अशोक पवार व त्यांचे समर्थक उघड बोलायचे. मात्र, प्राप्त परिस्थितीत दोन्ही आमदारांच्या नेत्यांमध्ये क्रॉसिंग झाल्याने व स्थानिक परिस्थितीही पूर्णपणे पालटल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.