Indapur News: लोकसभा निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व मातब्बर नेते एकीकडे असतानाही जनतेने नेत्यांचे न ऐकता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे खंबीरपणे साथ दिली. सुळे यांना इंदापूर तालुक्यातून २५ हजार ६८९ मताधिक्य मिळाले.
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप एकत्र असताना खासदार सुप्रिया सुळे यांना तालुक्यातून मताधिक्य मिळाल्यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे. आम्हाला गृहीत धरू नका, असा संदेश जनतेने नेत्यांना अप्रत्यक्षपणे दिला आहे.
बारामती लोकसभेची निवडणूक आगळीवेगळी झाली. राजकीय पक्षाचे नेते, पुढारी, पदाधिकारी अजित पवारांकडे तर जनता सुप्रिया सुळे यांच्याकडे असे चित्र निर्माण झाले होते. या निवडणुकीमध्ये शेतकरी वर्गाने महत्त्वाची भूमिका बजावत शरद पवार यांच्या पाठीमागे ताकद उभी केली. भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्याचा फटका महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बसला. भाजपला ४०० जागा मिळाल्यास संविधान बदलू शकते असा प्रचार सुरू झाल्याने ‘संविधान बचाव’ मोहिमेला गती आल्यामुळे दलित, मुस्लिम समाजाच्या मतांचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना झाला.
दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या विरोधात असतानाही निवडणुकीच्या काळामध्ये एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसत असल्याचा राग जनतेला आल्याचे मतदानातून इंदापूरच्या जनतेने दाखवून दिले. तालुक्यामध्ये २२ गावांतील शेतीच्या पाण्याचा, पंचतारांकित एमआयडीसीत नव्याने कंपनी आणण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत.
राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार व अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. इंदापूर तालुक्यातील पवारसाहेबांचा पक्ष फोडलेला जनतेला रुचले नाही. त्यामुळे आम्ही साहेबांच्या बरोबर असल्याचे मतदानातून इंदापूरच्या जनतेने दाखवून दिले.
२०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीची लढत खासदार सुप्रिया सुळे व भाजपच्या कांचन कुल यांच्यामध्ये झाली होती. त्यावेळी हर्षवर्धन पाटील कॉंग्रेसमध्ये होते. तसेच राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यासह तालुक्यातील भरणे व पाटील यांचे कार्यकर्ते सुळे यांच्या बाजूने होते. २०१९ ला सुळे यांना ७० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. २०२४ ला आमदार दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार यशवंत माने, माजी सभापती प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुक्यातील ७ जिल्हा परिषद सदस्य व १३ पंचायत समिती सदस्य, १७ नगरसेवक, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, नीरा-भीमा कारखाना व कर्मयोगी कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ व प्रमुख पदाधिकारी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा असतानाही खासदार सुप्रिया सुळे यांना २५ हजार ६८९ मतांचे मताधिक्य मिळाले. सुळे यांना जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, इंदापुरातील भरत शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा यांचा पाठिंबा होता.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर इंदापूर तालुक्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत. आमदार दत्तात्रेय भरणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ही उमेदवार उभा राहणार असल्यामुळे निवडणूक चुरशीची होईल.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली साधी, सरळ भाषणे करून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तालुक्यातील मतदारांना खासदार सुप्रिया सुळे यांची दमदाटी नसणारी साधी भाषणे भावल्यामुळे जनता सुळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.