पुणे, ता. ५ ः अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्यावर पुण्यात ठोसर पागा स्मशानभूमीत बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुताईंनी महानुभाव पंथाची दिक्षा घेतली असल्याने पंथाच्या संस्कारानुसार त्यांचा दफनविधी पार पडला. त्या आधी सरकारी इतमामात सलामी देण्यात आली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री विश्वजीत कदम, उल्हास पवार, अभय छाजेड, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.
मंगळवारी (ता. ४) रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. पार्थिव बुधवारी सकाळी नऊ वाजता रुग्णालयातून मांजरी येथे नेण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास ठोसर पागेत दफनविधीसाठी पार्थिव आणले गेले. पुण्यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर अंत्यविधीसाठी उपस्थित होते.
अन् ‘माई...’ असा हंबरडा फोडला
मांजरी : सिंधूताई सपकाळ यांचे पार्थिव येथील सन्मती बाल निकेतनमध्ये दाखल झाले अन् ‘माई...’ असा हंबरडा फोडत आश्रमातील चिमुरड्यांनी आपल्या अश्रूंचा बांध मोकळा केला. ‘अमर रहे; अमर रहे, सिंधूताई अमर रहे’ अशा घोषणा देत स्थानिकांसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो नागरिकांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागात असलेल्या त्यांच्या संस्थांच्या कार्यक्षेत्रातील काही नागरिक, कर्मचारी, शिकून स्वतःच्या पायावर उभी राहून संस्थेच्या बाहेर पडलेली मुले-मुली, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, सिंधुताईंचे मानसपुत्र, मानसकन्या, माहेर, सासरकडील नातेवाइकांसह राज्याच्या विविध भागातील मंडळींनी येथे येऊन अंत्यदर्शन घेतले. त्यांची कन्या ममता सपकाळ, मानसपुत्र दीपक, विनय, अरुण, संजय, मनीष आदींनी पार्थिवाचे पूजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.