मा. पोलिस निरीक्षक
विषय : सासूबाईंना ‘खाष्ट’ होण्याची तंबी देण्याबाबत.
साहेब, मी नव्या जमान्यातील मॉडर्न सून असून, माझ्या सासूबाई फार प्रेमळ आहेत. त्यांच्या या गुणांचाच मला फार त्रास होतो. त्यामुळे माझा मानसिक कोंडमारा होतो. साहेब, सासूबाई कधी प्रेमळ असतात का? त्यांनी खाष्टच असले पाहिजे, अशी माझी किरकोळ अपेक्षा आहे. ‘माहेरची साडी’सारख्या शेकडो मराठी-हिंदी चित्रपटांचा माझ्यावर अजून प्रभाव असल्याचाही तो परिणाम असावा. साहेब, आमच्या भिशी मंडळाच्या मिटिंगला अनेकजणी सासूविषयी तक्रारींचा पाढा वाचतात, सासूंनी मारलेले टोमणे अभिनयासह करून दाखवतात, सासूबाईंचा विषय निघाला, की अनेकींना किती बोलू आणि किती नको, असे होऊन जाते. वेळ कसा गेला, हेही अनेकींना कळत नाही, इतक्या त्या तल्लीन होतात. मग माझंच नशीब असं फुटकं कसं? माझ्या सासूबाईंनी आजतागायत मला एकही टोमणा मारला नाही की रागाने कधी बोलल्या नाहीत. मग भिशीत मी इतर बायकांच्या तोंडाकडे बघत बसण्याशिवाय मला पर्याय नसतो.
‘माझ्या सासूबाई फार प्रेमळ आहेत,’ असं मी म्हटलं की इतर महिलांना माझी दया येते. ‘सासूबरोबर भांडण होत नसेल तर मग तुझा वेळ कसा जातो,’ असा प्रश्न विचारून काहीजणी काळजी व्यक्त करतात. साहेब, जेवण अळणी बनवा, तिखट बनवा किंवा अगदीच बेचव बनवा. सासूबाई कधीही मला जाब विचारत नाहीत, की माहेरी हेच शिकली का? असा टोमणा मारत नाहीत. उलट काय चुकलं, हे प्रेमानं सांगतात. असं कसं चालेल? अनेक घरांमध्ये सासूबाईंचा एक तोरा असतो. त्या म्हणतील, तीच पूर्वदिशा असते. मग आमचेच घर त्याला अपवाद का? मी काय विचारले की ‘तुझ्यावर माझा विश्वास आहे. तुला योग्य वाटेल तो निर्णय घे, असं म्हणून मला त्या पूर्ण स्वातंत्र्य देतात. सासूबाई म्हणून अनेकींच्या घरात जरब असते, धाक असतो. आमच्याकडं असलं काही नाही. सोसायटीतील अनेक सासू-सुनांची भांडणे मी नेहमी पाहते. त्यावेळी त्या सुनांच्या भाग्याचा हेवा मला वाटतो. सासूबाईंनी माझ्याशी भांडावं, यासाठी मी खूप प्रयत्न केले. ऑफिसला लवकर जायचे आहे, असं म्हणून घरातील सगळी कामे त्यांच्यावर टाकून दिली. घरीही मी ऑफिसची कामे आणू लागले. हेतू हा की सासूबाईंनी मला जाब विचारून भांडणे उकरून काढावीत. पण कसलं काय? सासूबाई घरातील सगळी कामे करून, वर मलाच नाश्ता व चहा देऊ लागल्या. हे असं कसं चालेल? सासूबाईंना माझ्या माहेरच्यांचं तर फार कौतुक. माझे आई-वडील किंवा भाऊ आले तर त्यांची प्रेमाने विचारपूस करतात. त्यांना नवेनवे पदार्थ खाऊ घालतात. त्यांच्याविषयी चुकूनही वाईट बोलत नाहीत. अधून-मधून फोन करून त्यांची ख्यालीखुशाली विचारतात.
मग सांगा आमच्यात भांडण कसं होईल? माझा नवराही सासूबाईंच्याच वळणावर गेलाय. चुकूनही माझ्याशी भांडत नाही. साधं आवाज चढवूनही दोघे कधी माझ्याशी बोलले नाहीत. न सांगताच माझी हौसमौज पूर्ण करतात. मला तक्रार करण्यासाठी जागाच ठेवत नाहीत. असलं अळणी जीवन मला नकोसं झालंय. भांडणाचा झणझणीतपणा असल्याशिवाय जीवनाला काही अर्थ आहे काय? साहेब, सासूबाई म्हणून त्यांनी घरात तोरा मिरवावा, मला त्यांनी धाकात ठेवावे व आठवड्यातून दोनवेळा किमान दहा मिनिटे तरी माझ्याशी भांडावे, अधून-मधून मला टोमणे मारावेत, एवढीच माझी किरकोळ अपेक्षा आहे. वाटल्यास त्यांनी आमच्या सोसायटीतील कापसे काकूंकडे ‘खाष्ट सासू कशी व्हावी’, याबाबत क्लास लावावा. साहेब, तुम्हीही सासूबाईंना असं करण्यासाठी तंबी देऊन एका सुनेचा दुवा घ्यावा, ही विनंती.
कळावे,
एक सूनबाई.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.