पुणे, ता. १८ : शहरातील दवाखान्यांमध्ये सध्या सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या मुलांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये १० ते १३ टक्के मुलांना कोरोनाचे निदान होत असल्याचे निरीक्षण शहरातील बालरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. (cold cough precautions you should take)
शहरासह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमिवर शहरातील बालरोग तज्ज्ञांच्या दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप आलेल्या मुलांना घेऊन पालक येत आहेत. यातून काही मुलांना कोरोना झाला, तरीही पालकांनी घाबरून जाऊ नये. योग्य औषधोपचार, विश्रांती आणि द्रव पदार्थ आहारात घ्यावा, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे.
बालरोग तज्ज्ञ संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि लहान मुलांमधील कोरोनाच्या राज्य कृतिदलाचे सदस्य डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ‘‘ओमिक्रॉन विषाणू श्वासमार्गाच्या वरच्या भागांवर परिणाम करतो. नाक, घसा आणि श्वसननलिका या अवयवांना संसर्ग होतो. श्वासमार्गाच्या खालच्या भागावर फुप्फुस असते. तेथे हा विषाणू सहसा परिणाम करत नाही, असे निरीक्षण आहे. त्यामुळे मुलांमधील लक्षणे थोडीफार वेगळी आहेत. नाक चोंदणे व कोरडा खोकला याचे प्रमाण जास्त आहे. काही मुलांना खोकताना वेगळ्या प्रकारचा आवाज येतो (क्रूप). काहींना पोटात मळमळते, उलट्या होतात. मुलांना पाच दिवसांपेक्षा जास्त ताप सातत्याने राहिला असेल, मूल खात-पीत नसेल, सुस्त असेल, श्वासाचा वेग वाढला असेल आणि ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर ही धोक्याची लक्षणे समजून त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.’’ कुटुंबात ६० वर्षे वयापुढील वयोवृद्ध व्यक्ती, मधुमेह, लठ्ठपणा आणि रक्तदाब असलेल्या व्यक्ती, लसीकरण न झालेल्या व्यक्ती आणि जोखीम असलेली मुले असतील, तर कोरोना निदान चाचणी करून घ्यावी. ही चाचणी सरसकट करायची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काय करावे?
- सर्दी, खोकला आणि तापावर लक्षणानुरूप औषधे घ्यावी
- प्रतिजैविकांचा वापर करण्याची गरज नाही
- पाणी, फळांचा रस यासारख्या द्रवपदार्थांचा वापर अधिक करावा
‘‘ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस अजूनही पूर्ण केलेले नाहीत, त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे. तसेच, १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप केले नसल्यास त्वरित करून घ्यावे. लसीकरणामुळे आजार गंभीर होत नाही आणि रुग्णालयात भरती करायची गरज कमी होते.’’
- डॉ. प्रमोद जोग, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.