पुणे : शहरात बेकायदा बाईक टॅक्सी चालक व्यवसाय सुरू आहे. या विरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) कारवाई करण्यात येत आहे. स्टिंग ऑपरेशन करुन आरटीओने बाईक टॅक्सी व्यावसायिकांच्या २७५ दुचाकी ताब्यात घेतल्या असून, त्यांच्याकडून कायदेशीर दंडही वसूल केला जात आहे.
बाईक टॅक्सी चालकांवर थेट कारवाई करण्यास अडचणी येत असल्याने आरटीओ कार्यालयाने यावर युक्ती शोधली आहे. भरारी पथकातील आठ निरीक्षकांवर स्टिंग ऑपरेशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी थांबून डमी ग्राहक म्हणून ते थांबतात. वरुन बुकिंग करतात. बाईक टॅक्सी चालक त्यांच्या सोयीनुसार सेवा देण्यासाठी वरील विनंती स्वीकारतात. दुचाकीवर बसून त्याला आरटीओ कार्यालयात आणले जाते. कायद्याचा बडगा दाखवत दुचाकी ताब्यात घेतली जाते. पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाते. अशा प्रकारे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून या व्यवसायावर जरब बसविण्याची कार्यवाही आरटीओकडून केली जात आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाईक टॅक्सी व्यवसाय बेकायदा आहे. त्यामुळे हा व्यवसाय दुचाकी चालकांनी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा आरटीओने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला होता. तरीही राजरोसपणे दुचाकी चालकांकडून व्यवसाय सुरू आहे. या विरोधात पुणे, पिंपरी- चिंचवड परिसरातील सर्व रिक्षा चालकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. बाईक टॅक्सी कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी विविध रिक्षा संघटना आंदोलन करीत आहेत.
बाईक टॅक्सी चालकांवर गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरूच आहे. विशेष कारवाईसाठी आरटीओ अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. दुचाकीवर प्रवासी वाहतूक करणे सुरक्षित नाही. नागरिकांनी या सेवेचा वापर करू नये.
- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ
आरटीओ कार्यालयावर आंदोलन केले, त्यावेळी बाईक टॅक्सी चालकांवर तीव्र कारवाईचे आश्वासन दिले आहे. आरटीओतर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईचे आम्ही स्वागतच करत आहोत. या बेकायदा व्यवसायात पडून तरुणांनी करिअर खराब करुन घेऊ नये.
- बाबा कांबळे, समन्वयक, रिक्षा चालक- मालक संघटना कृती समिती
बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई करुन आरटीओने थांबू नये, तर बेकायदा व्यवसायावर जरब बसला पाहिजे. ॲप कायमस्वरूपी बंद केल्याशिवाय हा व्यवसाय बंद होणार नाही.
- डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.