पुणे : किरकोळ कारणावरून एका प्रवासी तरुणीला शिवीगाळ करीत, तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली, तर रात्रीच्या प्रवासावेळी जादा पैसे देण्यास नकार दिल्यावरून रिक्षा चालकाने एका प्रवाशाला जबर मारहाण केली. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या या घटनांमुळे पुन्हा एकदा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांचा मुजोरपणा प्रवाशांच्या जिवावर उठू लागला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही रिक्षाचालक पोलिसांनाही घाबरत नसल्याचे वास्तव आहे, तर पोलिसही त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई करीत नाही.
पुणे स्टेशन परिसरात सप्टेंबर २०२१ मध्ये अल्पवयीन मुलीवरील सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये काही रिक्षा चालकांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते, त्यापाठोपाठ एका रिक्षा चालकाने लहान मुलीला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटनाही शहरात घडली होती. या घटनांची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेत रिक्षा चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र, जानेवारी महिन्यापासून पुन्हा काही रिक्षा चालकांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रवाशांना फटका बसू लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
रात्रीच्यावेळी प्रवाशांची अडवणूक करून जादा भाडे घेणे, जादा भाडे देण्यास नकार दिल्यास प्रवाशाला मारहाण करणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यापासून जीवे मारण्याची धमकी देणे, एवढेच नव्हे तर रात्रीच्यावेळी प्रवाशांना रिक्षामध्ये बसवून रिक्षाचालक त्यांच्या साथीदारांच्या मदतीने प्रवाशांची लूटमार करीत असल्याच्या घटनाही शहरात घडल्या आहेत. गुन्हा घडल्यानंतरही पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे.
रिक्षा चालकांकडून घडलेले गुन्हे
१) हडपसर येथे तरुणीला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी
२) स्वारगेट येथे प्रवासी तरुणाने जादा पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण
३) मंगळवार पेठेत प्रवासी विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवीत मारहाण करून लुटले
शहरात सप्टेंबर महिन्यात गैरप्रकार करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध कारवाई सुरु केली होती. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांचे गैरप्रकार थांबले होते. पुन्हा एकदा वाहतूक शाखेला यासंदर्भात आदेश दिले जातील. संबंधित रिक्षा चालकांचे कागदपत्रे, बॅज तपासण्यासह त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? याबाबतची कारवाई लवकरच सुरु केली जाईल.
- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा
ज्यांच्याकडे अधिकृत बॅज व रिक्षा चालविण्याचा परवाना आहे, ते अधिकृत रिक्षा चालक. पूर्वी रिक्षा परवाना मर्यादित होता. परंतु राज्य सरकारने परवाना मुक्त केल्यापासून कोणीही ऊठसूट रिक्षा चालवीत आहेत. त्यांच्याकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यास राज्य सरकारच जबाबदार आहे. अशा व्यक्तींकडूनच गैरप्रकार घडत असून त्याचे खापर प्रामाणिक रिक्षा चालकांवर फोडले जात आहे. संघटना म्हणून आम्ही सर्व रिक्षा चालकांना गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत
तुमचा काय अनुभव....
असंख्य रिक्षाचालक प्रामाणिक आहेत. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही रिक्षा चालकांचा फटका प्रवाशांना बसत आहे. आपल्यालाही असा काही अनुभव आला असल्यास तो आम्हाला नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉटस्अपवर कळवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.