पुणे, ता. २७ ः रस्त्याने चालणाऱ्या लहान मुलाच्या डोक्यात लोखंडी गट्टू पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दुसरा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवार पेठेतील वर्तक बागेच्या कोपऱ्यावर मित्रांसोबत कॉफी पिणाऱ्या आयटी इंजिनिअर तरुणाच्या डोक्यात झाडाची फांदी पडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली. धक्कादायक म्हणजे या ठिकाणची फांद्या धोकादायक असल्याने त्या काढून टाकाव्यात अशी तक्रार चार महिन्यांपूर्वीच महापालिकेकडे केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच तरुणाचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अभिजित गुंड असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. कसबा पेठेतील गावकोस मारुती मंडळाजवळील वाड्यात अभिजित गुंड राहायला होते. शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अभिजित गुंड हे मित्रांसोबत कॉफी पिण्यासाठी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळील वर्तक बागेच्या कोपऱ्यावर आले होते. त्याच वेळी तेथे झाडाची वाळलेली फांदी थेट त्यांच्या डोक्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले. बेशुद्ध अवस्थेत पडल्याने त्यांच्या मित्रांनी त्वरित ऑटोरिक्षामधून त्यांना खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
जुलै महिन्यात केली होती तक्रार
२४१ शनिवार पेठ वर्तक बागेच्या समोरून नदीपात्रात ओंकारेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला जाणारा रस्ता आहे. तेथे कोपऱ्यावर अनेक तरुण चहा, कॉफी पिण्यासाठी येतात. याठिकाणी दिवसभर मोठी गर्दी असते. या कोपऱ्यावरील उंबराच्या झाडाच्या फांद्या वाळलेल्या असल्याने ते धोकादायक झाले आहे. त्यामुळे कधीही फांदी पडू शकते, येथे अनेक लोक उभे असतात. त्यामुळे कोणताही अनर्थ होण्यापूर्वी या फांद्या काढाव्यात, अशी तक्रार गणेश पाचरकर यांनी २९ जुलैला केलेली होती. त्यानंतर याकडे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तक्रारदार पाचरकर म्हणाले, ‘‘मी ऑनलाइन तक्रार केल्यानंतर महापालिकेने तेथे कोणतीही कारवाई केली नाही. माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अभिजित गुंड यांचा बळी गेला आहे.’’
कुटुंबाचा आधार गमावला
गुंड यांच्या वाड्यात राहाणारे हरिश बळगट म्हणाले, ‘‘अभिजित हे त्यांचे आई आणि भावासोबत राहात होते. अभिजित यांनी रमणबाग शाळेतून शिक्षण पूर्ण केले. रमणबागेच्या ढोलपथकात ते वादनही करायचे. आयटी इंजिनिअर असलेले अभिजित कुटुंबाचा आधार होते. त्यांच्या निधनाने आईला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. अभिजित आणि त्यांचे मित्र रविवारी सायंकाळी चहा पिण्यासाठी भेटले. त्यांनी मित्रांना चहा पाजला. पण अभिजित यांना कॉफी प्यायची असल्याने ओंकारेश्वर मंदिराच्या कोपऱ्यावर गेले आणि तेथे ही दुर्घटना घडली. महापालिकेने वेळीच फांद्या तोडल्या असत्या तर आज अभिजित यांचा हकनाक बळी गेला नसता.’’
वर्तक बाग येथील झाडाच्या फांद्या तोडण्यासंदर्भात ऑनलाइन तक्रार आलेली होती. त्यावर कारवाई झाली किंवा नाही. ऑनलाइन तक्रार बंद केली की कोणत्या कर्मचाऱ्याकडे प्रलंबित आहे याची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल.
- अमोल पवार, सहाय्यक आयुक्त, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय
दोन कुटुंबे उद्ध्वस्त
देशातील ‘राहाण्यास सर्वांत उत्तम शहर’ म्हणून पुण्याला ‘स्वच्छ भारत अभियान’मध्ये गौरविण्यात आलेले आहे. पण गेल्या चार दिवसांत काहीही चूक नसताना दोघांना जीव गमवावा लागला आहे. बुधवारी (ता. २२) रुद्र राऊत हा नऊ वर्षांचा मुलगा आईसोबत रस्त्याने चालत असताना त्याच्या डोक्यात बांधकाम साइटवरील लोखंडी गट्टू पडल्याने जीव गेला. या घटनेने शहर हादरलेले असताना आता रविवारी (ता. २६) सायंकाळी मित्रांसोबत कॉफी पिण्यासाठी गेलेल्या अभिजित गुंड यांच्या डोक्यात वाळलेली फांदी पडल्याने मृत्यू झाला. काहीही चूक नसताना या अचानकपणे दोघांचा मृत्यू झाल्याने दोन कुटुंब उद्ध्वस्त
झाली आहेत. याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत आपल्या सूचना सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
फोटो क्रमांक PNE23T85423, PNE23T85424
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.