Nanasaheb Peshwa esakal
पुणे

नानासाहेब पेशव्यांचं अखेरचं वास्तव्य भूतानमध्ये; इतिहास अभ्यासकांचा दावा, पुरावेही सापडले

ब्रिटिशांविरुद्धच्या १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात नेतृत्व करणारे नानासाहेब ऊर्फ नानाराव पेशवे (दुसरे) यांचे भूतानमध्ये वास्तव्य होते, असा दावा तेथील लेखक-संशोधक त्सेरिंग ताशी यांनी केला आहे.

गणाधीश प्रभुदेसाई

पुणेः ब्रिटिशांविरुद्धच्या १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात नेतृत्व करणारे नानासाहेब ऊर्फ नानाराव पेशवे (दुसरे) यांचे भूतानमध्ये वास्तव्य होते, असा दावा तेथील लेखक-संशोधक त्सेरिंग ताशी यांनी केला आहे. भूतानमधील नागरिकांचा यावर पूर्ण विश्‍वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी काही पुरावेही दिले आहेत. दरम्यान, नानासाहेब (दुसरे) हे गुजरात, कराची, इस्तंबूल इत्यादी ठिकाणी गेले किंवा नेपाळमध्येच मृत्यू पावले यापेक्षा भूतानचे पुरावे अधिक विश्‍वासार्ह वाटतात, असे इतिहासविषयक इंग्रजी लेखक डॉ. उदय कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.

दुसरे नानासाहेब पेशवे हे नानाराव या नावानेही ओळखले जातात. ते मध्य भूतानमध्ये ट्रोंग्सा येथे राहिल्याचे ताशी यांचे म्हणणे आहे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर इंग्रज आपल्या मागे लागले आहेत, युरोपभर खलनायक म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली गेली आहे, या जाणिवेमुळे नानाराव अज्ञातवासात गेले. नेपाळ, तिबेटसह सिक्किमच्या उंच पर्वतराशींवर आपल्या अनुयायांसोबत साधूंच्या पथकाबरोबर ते हिंडत होते, असे काही उल्लेख इतिहासात सापडतात. नानारावांचे पुढे काय झाले, हे गूढ आजही कायम आहे.

ताशी यांच्या दाव्यामुळे इतिहास अभ्यासकांसाठी नवीन माहिती पुढे आली आहे. भूतानमधील ट्रोंग्सा येथे नानारावांचा मुक्काम होता आणि तेथील राजाचे ते साहाय्यक, सल्लागार आणि मित्र होते असा मौखिक उल्लेख सापडत असल्याचा त्यांचा दावा आहे.
नेपाळमध्ये गेले असता तत्कालीन नेपाळ नरेश यांनी नानारावांना खूप त्रास दिला. त्यामुळे नानाराव भूतानमध्ये आले. तेथे नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी भूतानला मदत केली. अर्थात याचे कागदोपत्री पुरावे नसले तरी मौखिक पुराव्यांच्या आधारे भूतानमधील नागरिकांचा यावर पूर्ण विश्‍वास आहे, असे त्सेरिंग ताशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

इंग्रजीतून इतिहासविषयक लेखन करणारे डॉ. उदय कुलकर्णी यांनी नुकतीच भूतानला भेट देऊन याबाबतची माहिती गोळा केली. तेथील लोकांशी संवाद साधून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ट्रोंग्सा येथील ‘जोंग’ म्हणजे किल्ल्यात पहिल्या मजल्यावर दोन खोल्या आहेत, ज्याला ‘पेशाराजा खोली’ म्हणून संबोधले जाते. येथे शयनगृहाला जोडलेले स्नानगृह आहे. नानारावांचे वास्तव्य या दोन खोल्यांमध्ये होते, अशी माहिती तेथे सांगितली गेली.

दावा केला जातो ती नानाराव पेशवा यांचे वास्तव्य असलेली खोली.

याबाबत डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले, ‘‘१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील नानाराव पेशवे हे बिठूर-कानपूर-अवध मार्गे नेपाळला गेले. १८५८ मध्ये त्यांचे निधन झाले, अशी बातमी तेथील पंतप्रधानांनी इंग्रजांना सांगून स्वतःवरील दबाव कमी केला. १८५९ मध्ये नानाराव यांनी इंग्लंडच्या राणीच्या नावे जाहीरनामा काढला, जो कोलकत्याच्या ‘नॅशनल म्युझियम’मध्ये आजही बघता येतो. यानंतरही इंग्रज नानाराव यांना १९व्या शतकाअखेरपर्यंत शोधत राहिले.’’
‘‘नानाराव भूतानला आले आणि ट्रोंग्सा येथे राहून भूतानच्या इंग्रजविरोधी लढाईत सहभागी झाले. या विषयी कागदपत्रात काही उल्लेख आढळतात. ट्रोंग्सा येथील किल्ला-मठामध्ये ‘पेशाराजा खोली’ मला भूतान भेटीत पाहायला मिळाली. ताशी यांच्याशी विस्तृत चर्चाही झाली. त्यामुळे नानाराव पेशवे यांच्या अदृश्य होण्याच्या गूढामागील एक नवीन कथा आपल्यासमोर येते,’’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.

भूतानमधील ट्रोंग्सा डिझोंगचे विहंगम दृष्य

काही निरीक्षणे
-
मध्य भूतानमधील ट्रोंग्सा गावात ‘जोंग’ किंवा किल्ला आहे
- किल्ल्यातील दोन खोल्यांना ‘पेशाराजा खोली’ म्हणतात, नानाराव त्या खोलीत राहात असत
- तेथे जाताना नानाराव यांनी बरोबर महिषासूरमर्दिनीची प्रतिमा आणली होती
- आपल्याकडील एक रत्न नानारावांनी तेथील देवळातील मूर्तीला दान केले, असेही सांगितले जाते.

नानाराव पेशवा यांची १९९वी जयंती आठ डिसेंबरला होती. याच दिवशी मला साहित्य अकादमीची प्रेमचंद फेलोशिप प्रदान करण्यात आली. हा योगायोग नसून नानाराव व भूतान दरम्यान असलेले संबंध सिद्ध करणारी घटना आहे, असे मला वाटते. नानारावांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाद्वारे भारत-भूतान दरम्यानचे संबंध आणखी दृढ व्हावे ही अपेक्षा आहे.
- त्सेरिंग ताशी, लेखक-संशोधक, भूतान

इंग्रजांपासून संपूर्ण गोपनीयता राखूनच भूतानमध्ये राहणे आवश्‍यक होते. त्यामुळे ऐतिहासिक पुरावे आज दुर्दैवाने उपलब्ध नाहीत. भूतानच्या सीमेवरील इंग्रज सैन्यात १८६४ मध्ये ट्रोंग्साच्या प्रमुखाला सल्ला देणारी व्यक्ती नानाच आहे, अशी अफवा पसरली होती, असं एका इंग्रजी लेखकाने १९०७ मध्ये आपल्या ‘अंडर दी सन’ पुस्तकात नमूद केले आहे. सर्व परिस्थितीजन्य व मौखिक इतिहासावर आधारलेले हे कथानक आहे. तरी नानाराव इस्तंबूल, गुजरात, कराची इत्यादी ठिकाणी गेले किंवा नेपाळमध्येच मृत्यू पावले यापेक्षा भूतानचे पुरावे अधिक विश्‍वासार्ह वाटतात.
- डॉ. उदय कुलकर्णी, इतिहासविषयक इंग्रजी लेखक

ट्रोंग्सा येथे ज्या ठिकाणी नानासाहेबांचे वास्तव्य होते, असा दावा केला जातो ती जागा मी पाहिली आहे. भूतानमधील लेखक-संशोधक त्सेरिंग ताशी यांच्याशीही चर्चा केली आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे नानासाहेबांचे भूतानमध्ये वास्तव्य होते यात तथ्य आहे असे मला वाटते. १८५९पासून सहा वर्षे तरी ते तिथे होते. त्यानंतरची कसलीच माहिती मात्र उपलब्ध होत नाही.
- मोहिनी पेशवा-करकरे, नानासाहेब पेशवा यांच्या वंशज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची एकमताने निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

Ashok Chavhan : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला.....अशोक चव्हाण यांची बाळासाहेब थोरात आणि देशमुखांवर खोचक टीका

Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?

Zimbabwe beat Pakistan: यांना झिम्बाब्वेने हरवले... पाकिस्तानचे ६ फलंदाज ६० धावांत तंबूत, मोहम्मद रिझवाच्या संघाची गेली लाज

SCROLL FOR NEXT