पुणे, ता. ९ ः वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी वेताळ टेकडी तोडणे हा उपाय नसून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्याची गरज आहे. भविष्यात या वाहतूक कोंडीच्या समस्येबरोबर पाणीटंचाईच्या समस्येपासून वाचायचे असल्यास नागरिकांनाच सजग होऊन यासाठी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे,’ टेकडी फोड प्रकल्प म्हणजे ‘वड्याचं तेल वांग्यावर’, असा सूर ‘वेताळ टेकडी वाचवा’ या चर्चासत्रात उमटला.
पुणे महापालिकेच्या प्रस्तावित बालभारती- पौड रस्त्याच्या अनुषंगाने वेताळ टेकडी बचाव कृती समिती आणि लोकायत यांच्या वतीने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या समन्वयक डॉ. सुषमा दाते, सल्लागार अभियंते प्रदीप घुमरे, सामाजिक कार्यकर्ते रुशल हीना, खासदार वंदना चव्हाण, ज्येष्ठ लेखक मिलिंद बोकील, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, नदी सुधार समितीचे कार्यकर्ते सारंग यादवाडकर आदी उपस्थित होते, तसेच नागरिकांनी देखील यात सहभाग घेतला होता.
यावेळी डॉ. दाते म्हणाल्या, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या प्रस्तावीत प्रकल्पासाठी टेकडी फोडण्याची जी कारणे दिली जात आहेत, त्याचा नीट अभ्यास केला तर समजते की, याद्वारे वाहनांचा फेरा विशेष कमी होणार नाही. मात्र पर्यावरणाची हानी होईल. यात १८०० झाडे तोडण्यात येतील, असे म्हटले जात असताना प्रत्यक्षात याहीपेक्षा जास्त झाडे या प्रकल्पांतर्गत जाऊ शकतात. त्यावरील पक्ष्यांचे अधिवास धोक्यात येईल.’’
घुमरे म्हणाले, ‘‘याचा केवळ वेताळ टेकडी परिसरावर परिणाम होणार नाही, तर बाणेर-पाषाण-कोथरूड, भांबुर्डा-शिवाजीनगर-गोखलेनगर-जनवाडी, एरंडवणे या सर्व परिसरांच्या भूमिगत पाणी स्त्रोत्रांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन, पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. या टेकडीवर नैसर्गिक पाण्याच्या खाणी आहेत, त्या नष्ट होतील.’’
----------------------
‘हीत’ जोपासण्यासाठी धोरणांची अंमलबजावणी
वाहतूक कोंडीवर जगभर जे उपाय योजले गेले, भारतात विशेषतः पुण्यात त्याची पुनरावृत्ती होत असून, मूळ समस्या वेगळी आहे. मुळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था डळमळीत करून कार इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री आणि बिल्डर लॉबी यांच्या फायद्यासाठी सर्व धोरणे राबवली जात आहेत. पुण्यात दरवर्षी जवळपास ३ लाख वाहने रस्त्यावर येतात. एक लाख लोकसंख्येमागे केवळ १ बस असून, चांगल्या चालू स्थितीतील केवळ १६०० बस रस्त्यावर धावतात, असे यावेळी रुशल यांनी नमूद केले.
--------------------
यावर भर देण्यात यावा...
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे
- सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन देणे
- वाहन फ्री रस्ता करणे
- वाहनांवर कर लावणे, यातूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे शक्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.