पुणे : ‘‘सुरुवातीला मुलाचे डोळे लाल झाले. नंतर पत्नीच्या डोळ्यांमध्येही जळजळ होऊ लागली आणि दुसऱ्याच दिवशी मलाही डोळे दुखल्यासारखे जाणवू लागले. तिघेही नेत्रतज्ज्ञांकडे गेलो असता त्यांनी डोळे आल्याचे निदान करून औषधांची चिठ्ठी लिहून दिली. मात्र, शहरातील अनेक औषधालये पालथी घालूनही औषधे मिळाली नाहीत.
लाल डोळे घेऊन शहरभर फिरण्याची वेळ आमच्यावर आली आहे,’’ अशा शब्दांत खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या किरण बेलेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून डोळे येण्याची साथ वाढली आहे.
दरम्यान, या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना या औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे, परंतु ‘डोळे आल्यावर औषधे मिळत नसल्याची कोणतीही तक्रार आमच्याकडे आतापर्यंत आलेली नाही,’ असे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही औषधे डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली असून, तेच आपल्या दवाखान्यातून रुग्णांना विक्री करत आहेत, असा आरोप औषध विक्रेत्यांच्या संघटनेने केला आहे. मात्र, या सगळ्यात औषधांसाठी वणवण फिरण्याची वेळ रुग्ण तसेच नातेवाइकांवर येत आहे.
कोणी केली साठेबाजी?
शहरातील काही डॉक्टरांनी डोळ्यांच्या साथीवर प्रभावी ठरणारी औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहेत. त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना औषधाची चिठ्ठी न देता ते त्यांच्याकडील औषधे विक्री करतात. त्यामुळे साथ सुरू असताना डॉक्टरांनी औषधांची साठेबाजी केल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे.
किमती वाढल्या
डोळे आल्यावर नेत्रतज्ज्ञांनी लिहून दिलेली औषधे दुकानांमध्ये मिळत नाहीत. त्यांची मागणी वाढल्याने या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम काही औषधांच्या किमतींवर झाल्याचे निरीक्षण औषध क्षेत्रातील व्यावसायिकांनी नोंदविले. डोळे आल्यावर प्रभावी ठरणारी एक छोटी ट्यूब चार-साडेचार रुपयांना मिळत होती. तिची किंमत साडेसहा ते सात रुपयांपर्यंत गेल्याचेही त्यांनी सांगितले.
काय केले पाहिजे?
- शहरातील घाऊक औषध विक्रेत्यांकडूनच डॉक्टरांनी ही औषधे खरेदी केली आहेत. त्यामुळे कोणत्या डॉक्टरांनी किती औषधे खरेदी केली, याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने करावी
- डॉक्टरांना काही प्रमाणात स्वतःकडे औषध ठेवता येत असली तरीही मोठ्या प्रमाणात त्याची विक्री करण्यासाठी आवश्यक परवाना त्यांच्याकडे आहे का, याची चौकशीही प्रशासनाने करावी.
- डोळ्यांच्या साथीत साठेबाजी केल्याने या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणीही पुढे येत आहे.
डोळ्यांच्या साथीवरील औषधे मिळत नसल्याची एकही तक्रार कार्यालयाकडे आलेली नाही. अशी तक्रार आल्यास शहराच्या शेजारील जिल्ह्यांमधून किंवा विभागांमधून ही औषधे प्राधान्याने शहरातील रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील.
- श्याम प्रतापवार, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग
तज्ज्ञांच्या चिठ्ठीशिवाय डोळे आल्यावरील औषधांची विक्री न करण्याची सूचना नेत्रतज्ज्ञ संघटनेने केली होती. त्याप्रमाणे सर्व औषध विक्रेत्यांना सूचना दिल्या. मात्र, आता काही डॉक्टर स्वतःच ‘आय ड्रॉप’ची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते दवाखान्यातून विक्री करत आहेत. त्यामुळे काही नेत्रतज्ज्ञांनी लिहून दिलेली औषधे रुग्णांना दुकानात मिळत नाहीत.
- अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट.
डोळे आल्यावर प्रभावी ठरणाऱ्या औषधांची मागणी वाढली आहे. पण त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने या औषधांचा तुटवडा झाला आहे.
- अनुप गुजर, औषध विक्रेते
डोळ्यांची साथ देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे यावरील औषधांची मागणी अचानक वाढली. या पार्श्वभूमीवर औषधांची साठेबाजी हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे औषध वितरणाचा परवाना नसेल तर त्यांनी साठा करू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे.
- डॉ. मंदार परांजपे, अध्यक्ष, पुणे नेत्रतज्ज्ञ संघटना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.