पुणे, ता. २० : मतदानाचा टक्का वाढण्यासाठी कार्यकर्त्यांची सकाळपासून मतदान केंद्राच्या बाहेर सुरू असलेली लगबग, केंद्राच्या आतमध्ये सुरळीत पार पडणारे मतदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी चाकाच्या खुर्च्या, ऊन लागू नये यासाठी घातलेला मांडव, बसण्यासाठी खुर्ची, बाकांची सुविधा अशा शांततेच्या वातावरणात शहरातील आठही मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारयाद्यांतील घोळ कमी असल्याने केंद्राच्या बाहेर गोंधळ कमी असल्याचेही दिसून आले.
विधानसभा निवडणुकीसाठी कसबा पेठ, कॅंटोन्मेंट, पर्वती, हडपसर, खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर, वडगाव शेरी या मतदारसंघांतील तीन हजार ४० मतदान केंद्रांवर सकाळी सातपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. कोथरूड, कसब्यात काही केंद्रांवर मशिन सुरू होण्यास अडचणी आल्यानंतर सुमारे १५ मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले.
सकाळच्या वेळेत मतदान करून घेण्यासाठी उमेदवारांची यंत्रणा कामाला लागली होती. त्याचप्रमाणे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी सात वाजण्याच्या पूर्वीच मतदान केंद्राबाहेर रांग लावल्याचे चित्र कोथरूड, पर्वती, कसबा, शिवाजीनगर या मतदारसंघांत दिसून आले. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या लक्षणीय होती.
मोबाईलच्या कारणावरून वाद
मतदान केंद्राच्या आत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचा नियम पूर्वीपासून असला तरी त्याची कडक अंमलबजावणी केली जात नव्हती. पण यावेळी पोलिसांनी प्रवेशद्वारावरच मोबाईल आतमध्ये घेऊन जाता येणार नाही, असे सांगत अडवले. त्यामुळे नागरिकांची कोंडी झाली. अनेकांनी मोबाईल बंद करून घेऊन जातो, अशी विनंती केली, पण सकाळच्या वेळेत पोलिस ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तुम्ही मोबाईल बाहेर ठेवून जा किंवा घरी जाऊन परत या, अशा सूचना दिल्या जात असल्याने पोलिस व मतदारांमध्ये मतदान केंद्राबाहेर वादावादी झाली. अनेक नागरिक मतदान न करता निघून गेले तर काहींनी घरातील एका व्यक्तीकडे मोबाईल देऊन मतदान केले. त्यानंतर बाहेर थांबलेल्या व्यक्तीने मतदान केले. काही पोलिसांनी मतदान खोलीच्या बाहेर ठेवण्याची सूचना केली. त्यास मतदारांनी साथ दिल्यामुळे वाद झाले नाहीत.
उमेदवारांचे छायाचित्र काढण्यावर आक्षेप
सामान्य नागरिकांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मग उमेदवार मतदान केंद्रात जाऊन मतदान करत असल्याचे छायाचित्र कसे काय काढत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांना परवानगी आहे का, असाही प्रश्न काही मतदारांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीसारखा गोंधळ नाही
लोकसभा निवडणुकीवेळी मतदान खूप संथ गतीने झाले. एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्र असल्याने रांगा लागल्या होत्या. मतदारांना दोन तासांपेक्षा जास्त काळ रांगेत थांबावे लागले होते. पण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या रचनेत बदल करण्यात आला. मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. बऱ्याच ठिकाणी अर्ध्या तासाच्या आत नागरिक मतदान करून बाहेर पडत होते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले नाहीत. नोकरदार वर्गालाही दिलासा मिळाला.
चिठ्ठी मिळाल्याने गती वाढली
विधानसभा निवडणुकीला पुणे शहरातील मतदारसंघांमध्ये बहुतांश मतदारांना मतदानाची चिठ्ठी दोन ते तीन दिवस आधीच पोहोचविण्याची व्यवस्था निवडणूक आयोगासह उमेदवारांनी केली होती. त्यावर मतदान केंद्र, मतदार यादीतील क्रमांक यांसह सर्व माहिती असल्याने मतदार थेट केंद्रात जाऊन मतदान करत होते. चिठ्ठी आधी मिळाल्याने मतदान केंद्र बदलले तरी फारसा फरक पडला नाही. त्यामुळे मतदानाची गती वाढलेली होती.
छायाचित्रावरून अडवणूक
ज्या मतदारांकडे जुने मतदार ओळखपत्र आहे त्यावर त्यांचे छायाचित्र खूप वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील व्यक्ती आणि
ओळखपत्रावरील छायाचित्र यामध्ये फरक दिसून येत होता. त्यावर हरकत घेऊन मतदारांना मतदान करण्यापासून रोखले. आताचे छायाचित्र असलेले आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र घेऊन येऊन मतदान करण्यास सांगण्यात आले. त्यावरून काही ठिकाणी गोंधळ झाला. पण अन्य ओळखपत्र दाखविल्यानंतर किंवा विनंती केल्यानंतर मतदान करण्यास परवानगी देण्यात आली. ओळखपत्रावर नावात वेलांटी, मात्राची चुक असल्यानेही कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित तपासणी केली जात होती.
दुपारनंतर गर्दी वाढली
शहरातील आठही मतदारसंघांतील वस्ती, झोपडपट्टीचा भाग असलेल्या मतदान केंद्रांवर सकाळच्या टप्प्यात कमी मतदान झाले. दुपारी एकनंतर काही प्रमाणात मतदार बाहेर पडले. दुपारी तीननंतर मतदारांची मात्र मोठी गर्दी झाली होती. कासेवाडी, लोहियानगर, ताडिवाला रस्ता, खडकी, बोपोडी, जनता वसाहत, डायस प्लॉट, गंज पेठ, वारजे, माळवाडी, येरवडा, विश्रांतवाडी, रामटेकडी, कोंढवा यांसह अन्य भागांत गर्दी वाढली होती. यामध्ये अनेक महिला या घरातील कामे उरकून मतदानासाठी येण्याचे प्रमाण जास्त होते.
ठळक मुद्दे
- मतदान केंद्राबाहेरील राजकीय पक्षांच्या केंद्रावर स्लीप घेण्यासाठी गर्दी
- मतदारांसाठी वाहन व्यवस्था केल्याने ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी येण्याचे प्रमाण जास्त
- अनेक शाळांमध्ये मतदारांना बसण्यासाठी व सावलीसाठी व्यवस्था
- दुपारी एक ते तीन या वेळेत मतदारांची संख्या रोडावली
- काही मतदान केंद्राच्या बाहेर सेल्फी पॉइंट यावेळी गायब
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.