पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या विलगीकरण कक्षातून बिबट्या पळाल्याने यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण याचा प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यास अधिकाऱ्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याने यामध्ये वेळकाढूपणा सुरू असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेने हंपी येथून आणलेला सचिन नावाच्या बिबट्याने सोमवारी पहाटे पिंजऱ्यातून धूम ठोकली. बिबट्या पळाल्यानंतर दिवसभर शोधमोहीम सुरू होती, पण प्राणिसंग्रहालय बंद न करता पर्यटकांना प्रवेश दिला जात होता, तसेच या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना १२ तासांनंतरही अधिकृतपणे कळविण्यात आलेली नव्हती. सुदैवाने ४० तासांनंतर बिबट्या जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले.
पुण्यातील या प्रकाराची केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरण याची सखोल चौकशी करणार आहे. पण महापालिकेने यामध्ये प्राथमिक अहवाल सादर करण्यास सात दिवसांची मुदत दिली आहे.
हा अहवाल सादर केल्यानंतर आयुक्तांना तो सादर केला जाईल. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होणार आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ‘‘उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना सात दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
बिबट्या कसा पळाला, कोणत्या अधिकाऱ्यांनी कधी भेट दिली, पोलिस, अग्निशमन दल, वन विभाग कधी आले. सीसीटीव्हीचा वापर कसा केला, यांसह सर्व माहिती या अहवालात असेल. हा अहवाल आयुक्तांना सादर केल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करून याबाबत चौकशी सुरू केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.