पुणे

मुसळधार पावसात भाजपचा जल्लोष

CD

पुणे, ता. ४ : पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात असताना प्रत्यक्षात मतमोजणीत पुणेकरांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या बाजूने एकतर्फी कौल दिला. पहिल्या फेरीपासून मोहोळ यांना आघाडी मिळत असल्याने तणावाखाली असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बघता बघता एक लाखाच्या जवळपास मताधिक्य मिळाले. दुपारी चारच्या दरम्यान पावसानेही दमदार हजेरी लावली. त्यामुळे भर पावसात चिंब भिजत मोहोळ यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. ‘काय म्हणतात पुणेकर निवडून आले मुरलीधर’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामाच्या ठिकाणी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदान मोजण्यात आले. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडण्यास सुरुवात झाली. इतर मतदारसंघांच्या तुलनेत पुण्याचा निकाल येण्यास उशीर होत होता. त्यामुळे नेमके काय सुरू आहे, हे भाजप तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही समजत नव्हते.

सुरुवातीला भाजपच्या गोटात शांतता
नऊच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल हाती आला, त्या वेळी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना कसबा, पर्वती, पुणे कँटोन्मेंट आणि शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघांतून मताधिक्य मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ही निवडणूक घासून होणार, एकतर्फी होणार नाही अशी चर्चा उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. मात्र त्याचवेळी कोथरूडसह अनपेक्षितपणे वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपच्या बाजूने मतदान होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला.

मोहोळांना पहिल्या दोन फेऱ्यांपासून आघाडी
मोहोळ यांना कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी आणि वडगाव शेरी या मतदारसंघांतील लोहगाव, कळस, धानोरी या भागातून चांगले मतदान मिळत होते. त्यामुळे पहिल्या दोन फेऱ्यांतच १२ हजार ६०० पेक्षा जास्त आघाडी मोहोळ यांनी घेतली. त्यानंतर एकाही फेरीमध्ये धंगेकर यांना मताधिक्य मिळाले नाही. मोहोळ यांना तिसऱ्या फेरीत ६२००, चौथ्या फेरीत ८६७५, पाचव्या फेरीत ८०८५, सहाव्या फेरीत २८४५, सातव्या फेरीत ६८९१, आठव्या फेरीत १०५०, नवव्या फेरीत १०,३२३, दहावी फेरी ३६३९, अकरावी फेरी ६४७५, बाराव्या फेरीत १० हजार ६९७, तेराव्या फेरीत ८८०७ अशी आघाडी मोहोळ यांना मिळाल्याने एकूण मताधिक्य ९० हजारांच्या जवळपास गेले.

पावसासोबत मोहोळ यांची एन्ट्री
दहा फेऱ्या झाल्यानंतर मोहोळ यांचे मताधिक्य साठ हजारांच्या पुढे गेले. बाराव्या फेरीनंतर ८० हजारांचा टप्पा ओलांडताच विजयाचा विश्वास आल्यानंतर मोहोळ यांना चारच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रावर बोलविण्यात आले. मोहोळ आणि त्यांचे कार्यकर्ते जल्लोषात मतदान केंद्रात येत असताना त्याच वेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. घोषणा देत कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. एकीकडे जोरदार पाऊस आणि दुसरीकडे कार्यकर्तांमध्ये संचारलेला उत्साह यामुळे विजयाच्या जल्लोषात आणखीन भर पडली.

काँग्रेस नेत्यांचा काढता पाय
प्रत्येक फेरीमागे पाच ते आठ हजारांनी भाजपचे मताधिक्य वाढत होते. त्यामुळे काँग्रेसचे शहरातील प्रमुख पदाधिकारी, नेत्यांनी मतमोजणीतून काढता पाय घेतला. काही वेळाने काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेदेखील मतमोजणी केंद्रातून गायब झाले. स्वतः उमेदवार रवींद्र धंगेकर हे मतमोजणी केंद्राकडे फिरकलेदेखील नाहीत.

क्षणचित्रे
- मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त
- मतमोजणीसाठी टेबलवर जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रांगेत थांबून त्यांची तपासणी
- मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास मज्जाव असल्याने आकडेवारी घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी शोधल्या क्लुप्त्या
- विजयाची चाहूल लागताच भाजप पदाधिकारी मतमोजणी केंद्रावर दाखल
- भाजप कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्राबाहेर ढोलताशाच्या तालावर भर पावसात जल्लोष
- भगवा रंग उधळून कार्यकर्ते झाले भगवेमय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT