पुणे : बालगंधर्व रंगमंदिरापाठोपाठ शहरातील सर्वाधिक प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह असलेल्या गणेश कला क्रीडा मंच येथेही पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने प्रेक्षागृहात पाच ते सहा ठिकाणी गळती झाली, आवारात पाणी साचले, तसेच वातानुकूलित यंत्रणाही नादुरुस्त झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या नूतनीकरणानंतरदेखील या नाट्यगृहांची अवस्था लाजिरवाणी झाली आहे.
‘सकाळ’ने याबाबतचे वृत्त रविवारी (ता. ९) आणि सोमवारी (ता. १०) प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सोमवारी महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या अधीक्षकांसह भवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली. ‘‘बालगंधर्व रंगमंदिरातील परिस्थितीची पाहणी झाली असून, त्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना लवकरच केल्या जातील. बालगंधर्व रंगमंदिर आणि गणेश कला क्रीडा मंच येथील दुरुस्त्यांबाबत सांस्कृतिक विभागाकडून भवन विभागाला पत्र दिले जाणार आहे,’’ अशी माहिती नाट्यगृहाचे प्रशासन अधिकारी राजेश कामठे यांनी दिली.
शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने नाट्यगृहांची दुरवस्था समोर आणली. प्रशासन अधिकाऱ्यांनी यासाठी अधिक प्रमाणात झालेल्या पावसाला जबाबदार धरले. मात्र, संपूर्ण पावसाळ्यात असाच पाऊस कोसळत राहिल्यास नाट्यगृहांचे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे नाही. पाऊस अधिक झाला तरी नाट्यगृहाचे ‘वॉटर प्रूफिंग’ व्यवस्थित करण्यात आले असते, तर प्रेक्षागृहात पाण्याची गळती झाली नसती. मात्र प्रशासनाने ‘वॉटर प्रूफिंग’मध्ये काहीही चूक नसल्याचे म्हटले असून, केवळ पाइपमध्ये कचरा जमा झाल्यामुळे पाण्याची गळती झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
नूतनीकरणाचे कोट्यवधी रुपये ‘पाण्यात’
बालगंधर्व रंगमंदिर आणि गणेश कला क्रीडा मंच या दोन्ही नाट्यगृहांचे नूतनीकरण अवघ्या दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र या कामातील फोलपणा आता समोर येत आहे. ‘कार्पेट, कारंजे, रंगकाम अशा सुशोभीकरणाच्या आणि दिखाव्याच्या कामांपेक्षा मूलभूत सोयीसुविधा नीट करण्यावर भर द्यायला हवा होता. नूतनीकरणावेळी कलाकारांना, नाटकाशी संबंधित व्यक्तींना विश्वासात घेऊन काम केले असते, तर ते परिपूर्ण झाले असते’, अशी भावना कलाकार व्यक्त करत आहेत.
नाट्यगृहांमध्ये पाण्याची गळती होणे, हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करायला हव्यात. नूतनीकरणावेळी कामे झाले असतील, तर त्याची देखभाल व्यवस्थित होणेही गरजेचे आहे. बालगंधर्व रंगमंदिरात नूतनीकरणानंतर दोन महिन्यांतच स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता, मेकअप रूमपर्यंत आवाज ऐकू न येणे, आदी समस्या जाणवू लागल्या आहेत.
-भाग्यश्री देसाई, निर्मात्या व अभिनेत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.