Pune News : पुणे रेल्वे स्थानकामागील राजा बहादूर सिटी सेंटर परिसरातील पब-बारमध्ये गर्दी, गोंधळ, रेल्वे स्थानकापर्यंत ऐकू येणारा डिजेचा दणदणाट, झिंगलेल्या अवस्थेत बाहेर पडणारी तरुणाई असे चित्र १८ मे २०२४ पूर्वी दर ‘विकेंड’ला दिसायचे.
शनिवारी मात्र हा परिसर कमालीचा शांत होता. ‘क्राईम ब्रँचवाले रोज सगळी माहिती घेतायेत, उगाचच रिस्क कोण घेणार?’ अशा दबक्या आवाजात पबच्या काऊंटरवरील कर्मचारी ग्राहकांना सांगत असल्याचे चित्र पब, बार रेस्टॉरंटस्मध्ये दिसते. मात्र नियमांचे उल्लंघन करीत रात्री उशिरापर्यंत मद्य देण्याचा प्रकार काही पब-बार सर्रास करीत असल्याची वस्तुस्थितीही कायम आहे.
कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी झालेल्या अपघातानंतर पोलिस, महापालिका प्रशासनाने पब-बारवर कारवाईचा धडाका लावला. नाक्यांवरही तपासणी होऊ लागली. त्यामुळे तेथील ‘सूर’ काही प्रमाणात नरमल्याचे दिसते.
तरुणांची संख्या कमी झाल्याचे शनिवारी जाणवले. या परिसरातील पब-बारची शनिवारी रात्री ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने पाहणी केली. काही पब-बारमध्ये रात्री साडे अकरा वाजल्यानंतरही ग्राहकांना मद्य पुरविले जात असल्याचे दिसले.
वास्तविक रात्री अकरा वाजल्यानंतर मद्य देण्यास मनाई नाही, मात्र या नियमाचे उल्लंघन होत होते. पब-बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड तपासले जाते, ग्राहकाचे नावे, किती सदस्य आहेत, मद्य घेणार का, याबाबत विचारणा करून काही ठिकाणी काऊंटरवरच करून नोंद ठेवली जात होती.
मुले-मुली अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यास मद्य पुरविण्यास नकार दिला जात होता. मद्यपान केल्यानंतर गोंधळ, गडबड होऊ नये म्हणून बाऊन्सर्स करडी नजर ठेवत आहेत.
शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस रात्री उशिरा येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या जास्त असते. शनिवारी ही संख्या रोडावली होती. तरुण-तरुणींचे मोजकेच ग्रुप होते.
रात्री साडे दहा वाजल्यानंतर डिजेचा आवाज काहीसा कमी झाला. पार्किंगचा परिसर बहुतांश रिकामा होता. दरम्यान, याच परिसरातील हॉटेल्स-रेस्टॉरंटस्मध्ये सहकुटुंब जेवणासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.
नागरिक उशिरापर्यंत जेवण व सेवांचा लाभ घेत होते. महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन यांच्यावतीने कारवाई करण्यात आलेले पब-बार अद्यापही बंदच आहेत. तेथील परिसर, तसेच रस्त्यांवर पोलिसांचा वावर मात्र पुन्हा कमी झाला आहे.
काही पब-बारमध्ये रात्री उशिरापर्यंत येणाऱ्या ग्राहकांना सेवा पुरविण्याचा प्रयत्न संबंधित व्यावसायिकांकडून केला जातो. मद्याबाबत नियम सांगितल्यास तरुण-तरुणींचे समूह तत्काळ दुसरीकडे जाण्यासाठी वळतात.
अगोदरच ग्राहकांची संख्या रोडावल्याने येणाऱ्यांना माघारी पाठविले जात नाही. ‘लवकर ऑर्डर द्या, दिलेल्या वेळेत तुमचे आवरून घ्या’ अशा स्पष्ट सूचना दिल्या जात आहेत. पब-बार बाहेरून बंद असले तरी तेथे रात्री उशिरापर्यंत सेवा पुरविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.