पिंपरी - मेट्रोच्या संथपणे सुरू असणाऱ्या कामामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते पिंपरीदरम्यानचा दोन्ही बाजूचा रस्ता चिंचोळा झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत खडकी ते दापोडी रस्त्यावर मेट्रोच्या कामाला सुरवात झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक समस्येत भर पडणार आहे.
दरम्यान, या महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नजीकच्या काळात वाहनचालकांच्या त्रासात भर पडण्याची चिन्हे आहेत. पिंपरी ते दापोडीदरम्यान मेट्रो मार्गाचे काम धीम्यागतीने सुरू असल्याने सेवारस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. ग्रेडसेपरेटरमधील रस्ता दिवसभर वाहतुकीसाठी बंद असतो.
त्यामुळे सेवारस्त्यावरील ताण सातत्याने वाढत आहे. या रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी असल्याचे फलक लावलेले असतानाही नियमितपणे वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडताना दिसत आहे. मेट्रोने काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोरील रस्त्यावर कामाला सुरवात केली आहे. त्यामुळे वाहतूक समस्येत भर पडताना दिसत आहे.
खासगी वाहनांकडून बीआरटी मार्गाचा वापर....
काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या निगडी ते दापोडी बीआरटी मार्गाचा वापर खासगी वाहनचालक सर्रास करताना दिसतात. या वाहनचालकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. बीआरटी मार्गावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले असले तरी त्यांच्याकडून या प्रकारांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
वाहतूक कोंडीची ठिकाणे
दापोडी ते निगडीदरम्यानच्या रस्त्यावर फुगेवाडी चौक, शंकरवाडी चौक, कासारवाडी चौक, मोरवाडी चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी
फुगेवाडी चौकात सेवारस्त्यावर सकाळी व सायंकाळी वाहनांच्या रांगा
शंकरवाडी चौकात हीच समस्या कायम
कासारवाडी चौकातील सेवारस्त्यावर खासगी ट्रॅव्हलच्या बसेसमुळे कोंडीत भर
मोरवाडी चौकातील अरुंद रस्ता आणि सिंग्नलचा कमी वेळ यामुळे वाहनांच्या रांगा लागतात.
बीआरटी मार्गातून जाणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्याबाबत वाहतूक पोलिसांनी आदेश काढले आहेत. या रस्त्यावर त्यांच्याकडून कारवाईला सुरवात झाली आहे. त्यामुळे या मार्गातून खासगी वाहनांनी घुसखोरी करणे चुकीचे आहे.
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटी
मेट्रोचे काम कधी संपणार हे माहीत नाही. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या कायम राहण्याची चिन्हे आहेत. ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे सेवारस्त्यावर ताण वाढला आहे. या सर्व बाबींचा विचार करून मेट्रोने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे.
- केदार तुंगीकर, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.