पुणे : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने चित्र आणखीच विदारक होत चाललं आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळेना झाला आहे, तर काही ठिकाणी दोन रुग्णांना एकाच बेडवर उपचारासाठी ठेवण्यात आलं आहे. विद्येचं माघेरघर असणाऱ्या पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. परिणामी, त्याचा बोजा आरोग्य यंत्रणेवर पडत चालल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात कोरोनाची स्थिती किती भयानक होऊ लागली आहे हे ससून हॉस्पिटलमधील सद्यस्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. ससून हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ समोर आल्याने सर्वच पुणेकरांच्या मनात नक्कीच धडकी भरेल. कारण एकाच बेडवर २ किंवा ३ रुग्णांना ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ससूनमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे काही रुग्ण जमिनीवर पहुडलेले दिसत आहेत.
डॉक्टर संपावर जाणार
दिवसेंदिवस पुण्यात रुग्णसंख्या वाढत आहे, तशीच मृतांची संख्या आता वाढत चालली आहे. दोन ते तीन रुग्णांना एकाच बेडवर ठेवण्यात येत आहे. या सर्व गोष्टींना कंटाळल्याने डॉक्टरांनी संपावर जाण्याची तयारी केली आहे. बेडची संख्या वाढवली तरी मनुष्यबळ कमी पडत आहे. ससून परिसरात नवीन इमारत बांधून तयार आहे. त्याठिकाणी सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या तर काही रुग्णांवर नव्या इमारतीत उपचार सुरू करण्यात येतील, मात्र त्याकडे सरकार आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे.
फक्त २ निवासी डॉक्टर
अपुऱ्या मनुष्यबळाअभावी ससूनमधील डॉक्टरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे व्यवस्थापनाचे बारा वाजले आहेत. सध्या ससूनमध्ये २ निवासी डॉक्टर आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी क्वॉरंटाईन, आयसोलेशनच्या सुविधा नाहीत, त्यामुळे अनेक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. डिसेंबर २०२०मध्येच दुसऱ्या लाटेची कल्पना आली असताना शासनाने कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही. केंद्र सरकारचे एक पथक पाहणी करून गेलं. गेल्या दीड महिन्यापासून आवश्यक उपाययोजनांसाठी विनंती करण्यात येत आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ससूनमध्ये कामबंद आंदोलन
दरम्यान, राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करावे, सरकारचा ३१ डिसेंबर २०२० रोजीचा एकत्रित मानधनाचा अध्यादेश रद्द करून सर्वांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळाले पाहिजे, या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या माध्यमातून ससून रुग्णालयामध्ये गुरुवारी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन भारती, डॉ. स्वप्ना यादव, डॉ. गौतम वाघमारे, डॉ. मानसिंग साबळे, डॉ. विनिता लोंबार, डॉ. रागिणी भदाडे, डॉ. राजेश्री चांडोळकर, डॉ. कीर्ती खोले, डॉ. राहुल नेटकर, डॉ. प्रशांत दरेकर, डॉ. मृणाल कांबळे यांच्यासह २४ वैद्यकीय अधिकारी लाक्षणिक बंदमध्ये सहभागी झाले होते.
पुण्यातील प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या ससूनमध्ये अशी भयावह स्थिती आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातील रुग्णालयांबद्दल न बोललेलंच बरं. त्यामुळे सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे शक्य तितके पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, या सर्व गोष्टींचं भान आतातरी राखणार का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.