पुणे : राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, उद्योजकांना दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा आणि औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आली आहे. उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
'महाराष्ट्राची उद्योग भरारी' या उद्योग विभागाच्यावतीने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवाजी पाटील, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मुख्य अभियंता नितीन वानखेडे या वेळी उपस्थित होते.
उद्योग मंत्री सामंत म्हणाले, ‘‘मी स्वत: उद्योजक असून, उद्योजकांच्या अडचणींची मला चांगली जाणीव आहे. महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम उद्योग विभागातर्फे राबविण्यात आलेल्या योजनांची पारदर्शकता दाखविणारा आहे. उद्योगांसाठी सरकार सकारात्मक आहे. महाराष्ट्रात सात ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
आतापर्यंत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लहान आणि मोठ्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागतच आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे एकही उद्योग राज्याबाहेर गेला नाही. उद्योग विभागावर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्राचे नुकसान होते, ही बाब टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावी.’’
औद्योगिक क्षेत्रात जवळपास ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चून राज्यातील २८९ औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
बिडकीन औद्योगिक क्षेत्रात ५२ हजार कोटी रुपयांची, एक लाख कोटी रुपयांची विदर्भात आणि कोकण औद्योगिक क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत १० नवीन उद्योजकांना पाच कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘ पुणे व परिसरातील उद्योजक व कामगारांच्या समस्या सोडविण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे. रिंग रोड व मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूक समस्या सुटण्यास मदत झाली आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.