पुणे, ता. ८ ः घटस्फोटाच्या प्रकरणात न्यायालयाने समन्स बजावूनही पत्नी न्यायालयात हजर राहिली नाही. तिने न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले नाही अथवा बचावात्मक पुरावा सादर केला नाही. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने पतीला एकतर्फी घटस्फोट मंजूर केला. न्यायाधीश बी. डी कदम यांनी हा निकाल दिला.
नोकरी करत नसतानाही नोकरी करत असल्याचे सांगितलेले खोटे. पतीसह सासरच्या मंडळींना शिवीगाळ करणे. त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जाणे. पतीला मारहाण करणे, अशा पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. मात्र त्यात पत्नी हजरच राहिली नाही.
राहुल आणि लतिका (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. त्यांचे सहा जून २०२१ रोजी लग्न झाले होते. लतिका हिने पुणे विद्यापीठातून बी.कॉमची पदवी घेतल्याचे लग्नापूर्वी सांगितले होते. लतिका एका दुकानात अकाउंटंट म्हणून नोकरी करते. तिला १५ हजार रुपये पगार आहे. तिचे वडील पोलिस खात्यात कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. लग्न झाल्यानंतर दहा दिवसांत तिने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. मात्र तिला नेवून सोडणे शक्य नसल्याने तिने भांडणे सुरू केली व घरातील वस्तू फेकून दिल्या.
राहुल यांच्या आर्इ आजारी पडल्याने त्यांनी पत्नीला सांगितले की दूध गरम करून ठेव. काम सांगितल्याने तिने राहुल यांना शिवीगाळ करून डोक्यावर व पोटात मारहाण केली. राहुल यांची आई भांडणे सोडविण्यासाठी आली असता लतिका यांनी स्वयंपाक घरातील चाकू आणून सासूला जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून राहुल यांनी ॲड. पुष्कर पाटील यांच्यामार्फत न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने पत्नीला समन्स बजावला होता. मात्र समन्स बजावूनही ती न्यायालयात हजर झाली नाही. त्यामुळे घटस्फोटाचा दावा एकतर्फी चालवून न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.