लोणी काळभोर - शिरूर आणि हवेली तालुक्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. दोन्ही तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या विकासासाठी जास्त निधी उपलब्ध व्हावा. यासाठी हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे रुपांतर नगरपरिषदेत, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) आणि शिक्रापूर व सणसवाडी (ता. शिरूर) या गावांचा नगरपंचायतीत समावेश करावा, अशी मागणी शिरूर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार यांनी केली आहे.
आमदार अॅड. अशोक पवार यांनी प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना याबाबत निवेदन मंगळवारी (ता. १७) दिले आहे. हवेली तालुक्यातील उरुळीकांचन ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३० हजार ३०५, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची लोकसंख्या १९ हजार ३२९, लोणी काळभोर ग्रामपंचायतीची लोकसंख्या २२ हजार ५१८ आहे. शिरुर तालुक्यातील शिक्रापूर ग्रामपंचायतीची लोकसंख्या २० हजार २६३ तर सणसवाडी ग्रामपंचायतीची लोकसंख्या १३ हजार ५४३ आहे. या ५ गावांमध्ये मोठया प्रमाणात नागरीकरणात वाढ होत आहे. त्यामुळे या ५ गावांच्या विकासासाठी नगरपरिषदेत आणि नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले पाहिजे. असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत बोलताना अॅड. आमदार अशोक पवार म्हणाले कि, उरुळीकांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, शिक्रापूर आणि सणसवाडी या ५ गावांच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी त्यांचे रुपांतर नगरपरिषदेत आणि नगरपंचायतीमध्ये होणे गरजेचे आहे. वरील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत आणि नगरपंचायतीमध्ये झाल्यास शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध होणार असल्याने रस्ते, पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. याचमुळे वरील पाचही ग्रामपंचातींचे रुपांतर नगरपरिषदेत आणि नगरपंचायतीत होण्यासाठी सरकारी दरबारी मागणी केली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे आमदार पवार यांनी सांगितले आहे.
याबाबत सकाळशी बोलताना उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र बबन कांचन म्हणाले कि, उरुळी कांचनचे पाठीमागील १० वर्षापूर्वीच नगरपंचायतीत रुपांतर झाले पाहिजे होते. सद्या गावाची लोकसंख्या १ लाखाहून अधिक आहे. तसेच परिसरातील २५ गावांचे दळणवळण व आर्थिक व्यवहार येथूनच चालतो. त्यामुळे गावातील पायाभूत आणि मुलभूत सुविधांसाठी निधी कमी पडत आहे. उरुळी कांचन गावाच्या विकासासाठी तिचे नगरपंचायतीत रुपांतर होण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी घेतलेल्या निर्णय योग्य आहे.
याबाबत सकाळशी बोलताना लोणीकाळभोरच्या सरपंच माधुरीकाळभोर म्हणाल्या की, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी केलेले मागणी अतिशय योग्यच आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहे. नागरिकांना रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज यांसारख्या सोयीसुविधा मिळाव्यात. यासाठी आमचे सदैव प्रयत्न राहणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार अशोक पवार जो घेतील तो निर्णय मान्य असेल.
याबाबत सकाळशी बोलताना कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या की, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या विकासासाठी आमदार अशोक पवार यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. गावाची वाढती लोकसंख्या, आद्योगीकीकरण, कंपन्या आणि शैक्षणिक संस्था यामुळे नागरिकांना सुखसुविधा देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. परंतु, ''पीएमआरडीच्या'' माध्यमातून गावाचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. गावाच्या रहिवाशी क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. तसेच गावाला औद्योकीकरण क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गावाचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी नगरपरिषदेत रुपांतर होणे गरजेचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.