पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी त्याची मैत्रीण एड. प्रज्ञा कांबळे हिच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान, तिने अमली पदार्थ विक्रीतील पैशांचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध आता अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ललित पाटीलची मैत्रीण एड. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोघींना नाशिक पोलिसांनी अटक केली होती. ललित पळून जाण्यापूर्वी अर्चना आणि प्रज्ञा या दोघी त्याला ससून रुग्णालयाच्या परिसरात भेटल्या होत्या. रुग्णालयातून पलायन केल्यानंतरही ललितने नाशिकमध्ये दोघींची भेट घेतली होती. या वेळी मैत्रिणींनी त्याला पळून जाण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघींना अटक केली होती.
न्यायालयाने दोघींना सुनावलेल्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. प्रज्ञा कांबळेला ‘एनडीपीएएस’ कायद्यांतर्गत आरोपी करण्यात येत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी आज न्यायालयात सांगितले. त्यावर सहायक सरकारी वकील नीलिमा यादव- इथापे यांनी पोलिस कोठडीचा कालावधी राखीव ठेवत दोघींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार दोघींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
भूषण पाटील, अभिषेक बलकवडेची कारागृहात रवानगी
ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी संगनमताने नाशिकमधील शिंदे गावात गणेश एंटरप्रायझेस केमिकल फॅक्टरीमध्ये अमली पदार्थ तयार करून विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, काही आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल करायचे आहे. त्यामुळे दोघांना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. दरम्यान, हा गुन्हा एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात वर्ग करून न्यायालयीन कोठडीची ऑर्डर घेण्यात आली. त्यानंतर दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.