पुणे - 'महाविकास आघाडीमध्ये आम्ही कोथरूड, वडगाव शेरी व हडपसर अशा तीन जागा लढविण्यावर ठाम आहोत. वडगाव शेरी व कोथरूडबाबत चर्चा सुरू आहे, तर हडपसरची जागा शिवसेनेसाठी देण्याचे महाविकास आघाडीने कबुल केले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उमेदवारांचे नाव जाहीर करतील, 'असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत मुंबईत चर्चा सुरू असतानाच अंधारे यांनी हडपसरच्या जागेवर जोरदार दावा केल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
महायुती सरकारकडून करण्यात आलेल्या भुखंड घोटाळ्याची माहिती देण्यासाठी अंधारे यांनी सोमवारी दुपारी सेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतची माहितीही दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील व पुण्यातील जागेबाबत अंधारे म्हणाल्या, "जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची चांगली चर्चा झाली आहे. काही जागांचे सर्वेक्षण उद्यापर्यंत पुर्ण होतील. आता केवळ 15 तल 18 जागांबाबतची चर्चा उरली आहे. त्यामध्ये मुंबईची कुलाबा-शिवडी, नगरमधील श्रीगोंदा किंवा पारनेर, धाराशीवमधील तुळजापुर किंवा औसा या जागांबाबत चर्चा सुरू आहे.
त्यापैकी 7 तल 8 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात चर्चा होईल, तर उर्वरीत जागांबाबत शिवसेना व कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात चर्चा होईल. हडपसरची जागा शिवसेनेला देण्याचे महाविकास आघाडीने कबुल केले आहे. पक्षप्रमुख उमेदवारी घोषीत करतील.'
'देवेंद्र फडणवीस हे कोणतीच गोष्ट खरी बोलत नाहीत. शिवाजी महाराजांचे नाव घेणारे, भंडारा उधळणारे हे लोक लबाड आहेत', अशी टीका अंधारे यांनी केली. अंधारे म्हणाल्या, "सगळे कंत्राटदार अडचणीत आल्याचे नितीन गडकरी यांनीच सांगितले आहे. योजनेसाठी साडे तीन हजार कोटी रूपये एका महिन्यासाठी लागणार आहे. सध्याची तुट भरून काढण्यासाठी पुढील आठ वर्षे लागणार आहेत.
तरीही घोषणांची खैरात केली जात आहे, कंत्राटी कर्मचारी, आश्रमशाळा, आशा सेविका यांच्या पगारावर परिणाम होणार आहे.' डॉ.नीलम गोऱ्हे एकही नगरसेवक निवडुन आणू शकलेल्या नाहीत, त्या एखादा मतदारसंघ त्यांच्यासाठी जाहीर करतील, हीच ब्रेकींग न्युज असेल. मुख्यमंत्र्यांनीही गोऱ्हे यांना एखादी जागा देऊन त्यांची लोकांमध्ये किती पत आहे, हे पहावे, अशी टीका अंधारे यांनी केली.
पुण्यात सात महिन्यात 265 बलात्कार
पुणे शहरात सात महिन्यात 265 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यातील अनेक आरोपी जामीनावर सुटले आहेत. पुणे पोलिसांचा कारभार अयोग्य दिशेने सुरु आहे. पत्रकारांना पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे पुढे मांडणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
मी राखीव नव्हे, खुल्या प्रवर्गात येते
कुर्ला, अंबरनाथ यांसारख्या राखीव मतदारसंघासाठी माझ्या नावाची चर्चा होते. आंबेडकरी चळवळीमध्ये मी अनेक वर्ष काम केल्यामुळे तशी चर्चा असेल. मात्र, मी राखीव प्रवर्गात नव्हे, तर खुल्या प्रवर्गात येते. त्यामुळे कुठल्याही राखीव जागेसाठी माझे नाव चर्चेस आले, तरी त्याचा काही उपयोग नसल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले.
कोट्यावधी रुपयांचे भुखंड नेत्यांच्या घशात
सरकारने संजय राठोड, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एका आमदाराला कोट्यावधी रूपयांचे भुखंड वाटप केले आहेत. कोट्यावधी रूपयांच्या भुखंडाची खैरात सरकारने आपल्या लोकांवर असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.