मुलींसोबत येथे येऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना हटकल्याने ही मारहाण करण्यात आली आहे.
आंबेठाण : तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर (ता. खेड) येथे वारकरीपंथाचा अभ्यास करणाऱ्या साधक वारकरी (Warkari) विद्यार्थ्यांना तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आलीये. मुलींसोबत येथे येऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना हटकल्याने ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा भामचंद्र डोंगर (Bhamchandra Dongar Khed) पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून निषेध करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वासुली परिसरात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधक या ठिकाणी वर्षानुवर्षे राहून अभ्यास करतात. आजही या ठिकाणी जवळपास ३० ते ४० विद्यार्थी अभ्यास करतात. परंतु, काल (दि. १६) एक तरुण मुलगा आणि मुलगी येथे आल्यानंतर त्यांचे अश्लील चाळे सुरू होते. यावरून कुलदीप शिवगोंडा खोत या अभ्यास करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांने त्यांना हटकले असता, त्या तरुणाने अभ्यास करणाऱ्या साधकाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि संध्याकाळी पुन्हा मित्रांना बोलावून अधिक मारहाण केली.
या घटनेत साधक विद्यार्थ्याचा पाय मोडला असून त्याच्या सोबतच्या एका विद्यार्थ्याला देखील जखमी केले आहे. या साधकावर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. या घटनेचा भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने निषेध केला असून या तरुणांच्या टोळक्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भामचंद्र डोंगर येथे नेहमी तळीराम आणि प्रेमी युगुल वावरत असतात. त्यांच्याकडून यापूर्वी देखील अनेक साधकांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत.
परंतु, आता मारहाण झाल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून येथे अभ्यास करणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. अधिकचा तपास म्हाळुंगे पोलिस स्टेशनचे (Mhalunge Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश नवले आणि त्यांचे सहकारी करीत आहे.
या ठिकाणी असे घडणारे प्रकार चुकीचे आहेत. पूर्वी असे प्रकार घडत नव्हते. या ठिकाणी पोलिस प्रशासन किंवा स्थानिक लोकांनी मिळून यावर नियंत्रण ठेवायला हवे.
-ह.भ.प. शंकर महाराज मराठे (भामचंद्र निवासी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.