पुणे - शहरातील खड्डे बुजविण्यासाठी आदर्श नियमावलीचे पालन केले जाईल असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात खड्ड्यात पाणी जमा झालेले असताना त्यात सिमेंट काँक्रिट टाकून खड्डा बुजविण्याचा अजब प्रकार महापालिकेच्या ठेकेदारांनी सुरु केला आहे. वारजे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा प्रकार समोर आला.
पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना खड्डे पडून चाळण झालेली आहे. वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत असून, कोंडीत भर पडत आहे. खड्डे बुजविताना चुकीच्या पद्धतीने डांबर किंवा सिमेंट काँक्रिट न टाकता नियमानुसारच खड्डा बुजविला पाहिजे असे ठेकेदारांना, अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार काही काही भागात कार्यवाही सुरु आहे. पण अद्याप काही ठेकेदार त्यांच्या मनमर्जीप्रमाणे खड्डे बुजवत आहेत.
वारजे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून कर्वेनगरच्या दिशेने जाताना दुपारी साडेतीनच्या सुमारास सिमेंट काँक्रिटने रस्ता बुजविण्याचे काम सुरु होते. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यात पाणी जमा झालेले असताना हे पाणी बाहेर न काढता मिक्सरमधून सिमेंट काँक्रिट ओतून खड्डा बुजविण्यात आला. पण रस्त्याचा हा सगळा भाग भुसभुशीत झाला होता, सिमेंट काँक्रिटमधून पाणी वाहत होते.
यावेळी ठेकेदाराच्या कामगारांकडे चौकशी केली असता, हे काम पाण्यात काँक्रिट टाकले तरी काही होणार नाही, रस्ता चांगला होईल असा दावा केला. दरम्यान हे काम सुरु असताना महापालिकेचा कोणताही उपअभियंता किंवा कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हते.
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘हे काम पाणी पुरवठा विभागाचे आहे का ते तपासले जाईल. त्यानुसार कारवाई केली जाईल.’
"हे काम पाणीपुरवठा विभागातर्फे असे केले जात आहे. अशा प्रकारे खड्डा बुजविणे योग्य नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल तसेच हे काम पुन्हा नव्याने केले जाईल
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख पथ विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.