शिक्रापूर : मंडळीहो, कोरोनाकाळात सगळंच गंभीर घडतं असंही का नाही बरकां... या काळात गावागावात अनेक मजेशीर किस्से घडत आहेत. असाच एक मजेशीर किस्सा शिक्रापूर (ता.शिरूर, जि.पुणे) जवळील एका गावात घडलाय. या गावातील पाटलाच्या पोराचं लग्न नुकतंच झालं. जिल्हाधिका-यांच्या लग्न-समारंभ नियामावलीप्रमाणे शिक्रापूर पोलिसांना सांगून पाटलांनी पन्नास जणांची उपस्थिती ’रितसर’ मंजुर करुन घेतली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गावाजवळीलच एका मंगल कार्यालयात हा सोहळा करायचे ठरले आणि मुहुर्ती पै-पाहुणे गोळा होवू लागले. कितीही नाही म्हटले तरी पै-पाहुणे दिडशेच्या वर गेलेच. पाटलांचा मोठा भाऊ पुण्यात उच्चपदस्थ अधिकारी असल्याने त्याला या गर्दीची पूर्वकल्पना होतीच. पर्यायाने जर आपली जादा उपस्थितीची तक्रार कुणी केलीच तर किमान सोशल-डिस्टंसिंग आणि सर्व व-हाडींना उच्च दर्जाचे मास्क लावून लग्न लावल्याचे सांगता येईल म्हणून या पठ्ठ्याने सरसकट भगव्या रंगाचे २०० ’एन-९५ मास्क’ मंगल कार्यालयाच्या गेटवरच ठेवले. अर्थात आणलेले मास्क नीटपणे प्रत्येक व-हाडीच्या आणि छान मेकअप करुन आलेल्या महिलावर्गांच्या थेटत तोंड आणि नाकावर नीट चढविण्यासाठी तीन कॉलेज युवती ठेवल्या.
’मास्कशिवाय प्रवेश नाही’ अशी सक्त ताकद दिलेल्या या शुभकार्याला ठरल्याप्रमाणे पाहुणे आले आणि प्रत्येकाच्या तोंडावर हे सगळेच भगव्या रंगाचे, एकाच ढंगातले आणि अनोख्या मुंगुसाच्या तोंडाच्या स्टाईलचे एन-९५ मास्क लावले गेले. अगदी रांगेत, शिस्तीत आणि ब्राम्हणासह सर्वांच्याच तोंडावर चढविलेले हे मास्क लावल्याचे चित्र म्हणजे ’पंढरीच्या वारीत भगव्या पताका खांद्यावर घेवून मधल्या एखाद्या गावातील ठिय्यावर आरतीसाठी सगळेच वारकरी रांगेत उभे राहिलेत असेच सगळे भासत होते.
अर्थात हीच ’पारखी नजर’ एका राजकीय पदाधिका-याची जागृत झाली आणि वधु-वरांना शुभेच्छा देताना त्यांनी हीच ’मास्करुपी भगवी पताका लवकर दूर होवो...’ अशी विश्वकल्याणाची मजेशीर शुभेच्छा या सोहळ्यात सर्वांना दिली. असे सगळेच मजेशीर चित्र पाहून खरे तर सगळ्याच व-हाडींची कोरोनाच्या काळातही मास्कमधून ’कळी’ खुलली होती. मास्कमधूनच ब्राम्हणाने मंगलास्टक म्हणून लग्नसोहळा पार पडला खरा पण सगळेच ’भगवे मास्कधारी’ पाहून यावर्षी रद्द झालेल्या पंढरपूर वारीचा ’फिल’ या लग्नसोहळ्याने दिला आणि कोरोनाकाळातील एक मजेशीर लग्नसोहळा सर्वच उपस्थितांच्या चेह-यावर मिस्किल हास्यासह पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.