‘‘माझ्या मुलीचा हात मागायला आला आहेस, तुझ्या नावावर काही आहे का’’? राघोपंतांनी स्वप्नीलला विचारले.‘‘दळणाच्या डब्यावर माझेच नाव आहे. शिवाय कुकर आणि परातीवर पण माझेच नाव आहे.’’ स्वप्नीलने निरागसपणे सांगितले.‘‘अरे बाबा ! घर-दार, जमीन-जुमला काही आहे का’’? राघोपंतांनी आवाज चढवत विचारले.‘तसलं काही नाही म्हणून तर प्रेमाचा ‘जुमला’ केला आहे.’ स्वप्नील पुटपुटला.‘‘टू बीच के फ्लॅट आहे...भाड्याचा. शिवाय नोकरीसाठी कालच एके ठिकाणी मुलाखत दिलीय. शिवाय मी घरची सगळी कामे करतो. तुमच्या मुलीला राणीसारखं ठेवेन.’’ स्वप्नीलने आत्मविश्वासाने सांगितले. ‘‘राणीसारखा ठेवेन म्हणजे? राणी काय मोलकरणीचं नाव आहे का’’? राघोपंतांनी कुत्सितपणे विचारलं. त्यानंतर आणखी काही प्रश्नोत्तरे झाल्यानंतरस्वरालीसाठी हे स्थळ योग्य नसल्याचा निकाल देत, राघोपंतांनी बैठक संपवली.
‘तुम्ही दोघांनी परत कधीच भेटायचं नाही,’ असा सज्जड इशारा देत राघोपंतांनी स्वप्नीलला हाकलून दिले. तीन दिवसांनी तो पुन्हा स्वरालीला भेटायला आला. त्यावेळी राघोपंतांनी त्याला दारातूनच परत पाठवलं व पुन्हा आल्यास पोलिसांत जाण्याची धमकी दिली. हे पाहून लाडका बोका प्रिन्सला छातीशी कवटाळून स्वरालीने अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
सारसबागेतील नारळाच्या झाडाखाली निराश मनःस्थितीत स्वप्नील बसला. स्वरालीला कसं भेटता येईल, याचाच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. आपण जर ‘प्रिन्स’ झालो तर स्वरालीला भेटण्यापासून आपल्याला कोणी रोखणार नाही, अशी मजेदार कल्पना त्याला सुचली. त्याने सहज ‘मला प्रिन्स बोका बनायचंय’ असं म्हटलं आणि काय चमत्कार! त्याचं अवजड शरीर गायब होऊन, मऊ लुसलुशीत बोक्याचं शरीर झालं. झुबकेदार शेपटीही त्याला आली. मग काय त्याने स्वरालीच्या घराकडे धूम ठोकली. दारातच त्याला आधीचा बोका दिसला. त्याच्याशी भांडण करीत, त्याला हाकलून लावले. थोड्यावेळाने स्वरालीने प्रिन्सला छातीशी कवटाळून, ‘‘स्वप्नील, मला तुझी खूप आठवण येते. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही,’’ असे म्हणून रडू लागली.
‘स्वराली रडू नकोस. मीच स्वप्नील आहे.’ असे स्वप्नील म्हणू लागला. पण ‘म्यॉंऽऽव.. म्यॉंऽऽऽव’ शिवाय त्यांच्या तोंडून काही बाहेर पडेना. एक-दोन दिवस स्वरालीच्या घरी राहिल्यानंतर स्वप्नील पुन्हा सारसबागेत आला व ‘मला पुन्हा स्वप्नील व्हायचंय’ असे म्हणाला. त्यानंतर काही सेकंदात त्याने माणसाचे शरीर धारण केले. त्यानंतर हे रोजचेच होऊ लागले. स्वरालीला मनोसक्त भेटण्यासाठी तो केव्हाही प्रिन्स बनून तिच्या घरी जावू लागला.
राघोपंतांनी त्याला उचलून घेतल्यानंतर सूड म्हणून तो त्यांना बोचकारू लागला. शिवाय अंगावरही फिस्कारायचा. त्यांच्या ताटातील मासे मुद्दाम पळवून न्यायचा. आपला प्रिन्स अचानक आपल्याशी असा का वागायला लागला, याचं कोडं त्यांना काही केल्या सुटेना.
काही दिवसांनंतर माणसाचे शरीर धारण करण्यासाठी ‘प्रिन्स’ सारसबागेत गेला. मात्र, तेथील नारळाचे झाड महापालिकेने तोडल्याचे पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्याने दुसऱ्या नारळांच्या झाडाखाली जाऊन, ‘मला स्वप्नील करा’ असे म्हटले पण काही उपयोग झाला नाही. स्वप्नील आता प्रिन्स बनून स्वराली सोबतच राहू लागला. मात्र, मूळ स्वप्नील भेटेना म्हणून स्वराली कासावीस झाली. काही महिन्यांनी स्वरालीचे लग्न झाले. तिला सासरी पाठवणीवेळी प्रिन्सच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. ते पाहून स्वरालीच्या आईने भर मांडवात हंबरडा फोडला. ‘‘बघा हो बघा ! स्वरालीचा मुक्या प्राण्यांवर किती जीव होता. ती सासरी जाणार म्हणून आमचा प्रिन्स सकाळपासून उपाशी आहे आणि आता तर त्याच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्यात.’’ हे पाहून सगळ्या मांडवात ‘एका कोपऱ्यात निपचित पडून बोका कसा रडत होता,’ याचीच चर्चा रंगू लागली.
स्वप्नीलचा घात कशामुळे झाला, याची कल्पना स्वरालीला आली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवसांपासून तिने वृक्षतोडीच्या विरोधात आवाज उठवायला सुरवात केली. आता वृक्षप्रेमी म्हणून तिची पुण्यात ओळख आहे.
सु. ल. खुटवड
(९८८१०९९०९०)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.