पुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. अन्नद्रव्यांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे राज्यातील जमिनीची सुपीकता कमी होत असल्याचे निदर्शनास अाले आहे.
जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश ही तीन अन्नद्रव्ये, तांबे, लोह, मॅंगेनीज आणि जस्त या सूक्ष्म मूलद्रव्यांच्या प्रमाणावर जमिनीची सुपीकता ठरते.
जमिनीची सुपीकता पाहणी करण्यासाठी कृषी विभागाच्या मृद सर्वेक्षण व मृद संधारण विभागातर्फे दर पाच वर्षांनी प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीच्या सुपीकतेची तपासणी करण्यात येते. राज्यातील जमिनीत पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य असलेले स्फुरदचे प्रमाण कमी, तर पालाशचे वाढले आहे. याचबरोबरीने लोह आणि जस्ताचे प्रमाण कमी झाल्याने सुपीकतेवर परिणाम झालेला आहे. परिणामी पीक पोषणात असमतोलता निर्माण होऊन पीक उत्पादकता घटली आहे.
नत्र अन्नद्रव्य
प्रमाण कमी असलेले जिल्हे
सोलापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.
स्फुरद अन्नद्रव्य
प्रमाण कमी असलेले जिल्हे
रत्नागिरी, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकाेला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
लोह सूक्ष्म अन्नद्रव्य प्रमाण कमी असलेले जिल्हे
नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, आैरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.
जस्त सूक्ष्म अन्नद्रव्य प्रमाण कमी असलेले जिल्हे
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, आैरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.
माती तपासणीचे निष्कर्ष
स्फुरदाची कमतरता. स्फुरद सुपीकता निर्देशांक १.२१ असल्याने सुपीकता स्तर हलका.
नत्राचा सुपीकता निर्देशांक १.५०. स्तर मध्यम.
पालाशचे प्रमाण अधिक. सुपीकता निर्देशांक २.६५, तर सुपीकता स्तर उच्च.
जस्त सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण सर्वांत कमी, तर लोहाचे प्रमाण कमी.
तपासलेल्या मातीच्या नमुन्यांपैकी जवळपास ५४.९९ टक्के नमुन्यात जस्ताचे, तर ४२.८० टक्के नमुन्यांमध्ये लोहाचे प्रमाण कमी. फक्त ५.८९ टक्के नमुन्यांमध्ये मॅंगेनीज तर अवघ्या ४.९१ टक्के नमुन्यांमध्ये तांब्याचे प्रमाण कमी.
सर्वच जिल्ह्यांमध्ये पालाशचे मुबलक प्रमाण.
सोलापूर जिल्ह्यात नत्र आणि स्फुरदाची खूपच कमतरता असली तरी पालाशचे प्रमाण अधिक.
विदर्भासह, मराठवाडातील सर्वच, तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात स्फुरदाची कमतरता. उस्मानाबाद, वाशीम, सोलापूर जिल्ह्यांतील जमिनीत स्फुरद खूपच कमी.
रत्नागिरी जिल्ह्यात नत्राचे भरपूर प्रमाण.
राज्यात बहुतांशी जिल्ह्यात जस्त आणि लोहाचे प्रमाण कमी, तर तांबे आणि मॅंगेनीजचे पुरेसे प्रमाण.
भंडारा, औरंगाबाद, नगर, बीड जिल्ह्यांमध्ये तांब्याची कमतरता, तर धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीममध्ये तांब्याचे चांगले प्रमाण.
काेकणातील सर्वच जिल्ह्यांत लोहाचे प्रमाण चांगले असून, वाशीम जिल्ह्यातील सर्वच नमुन्यांत लोहाचे पुरेसे प्रमाण. जालना जिल्ह्यात लोहाची कमतरता.
सातारा जिल्ह्यात मॅंगेनीजचे प्रमाण कमी.
गांडूळ खत, कंपोस्ट खत, जैविक खते, हिरवळीची खते आदी सेंद्रिय घटकांच्या वापरातून सेंद्रिय कर्ब वाढविणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी जमिनीत कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा शिफारशीनुसारच द्यावी.
- अशोक बाणखेले, उपसंचालक, मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.