भाजपने चारशे जागा जिंकल्यास राज्यघटना बदलून आरक्षण रद्द होईल, हा मुद्या दलित समाजाने गांभीर्याने घेतला. परिणामी, उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या.
पुणे : देशात मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या निरंकुश सत्तेला लगाम घालण्याचे काम यावेळीच्या लोकसभा निवडणुकीद्वारे (Lok Sabha Elections) मतदारांनी केले आहे. निवडणुकीनंतर भाजपने (BJP) काही पक्षांसमवेत सरकार स्थापन केले. मात्र, त्यांच्यासमवेत आघाडी केल्यानंतरही महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवण्याची भाजपची चाल यशस्वी ठरली आहे, असे मत 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या सहयोगी संपादिका आणि लेखिका नीरजा चौधरी (Neerja Chaudhary) यांनी शनिवारी व्यक्त केले.
पत्रकार व्यंकटेश चपळगावकर (Journalist Venkatesh Chapalgaonkar) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश यांच्यातर्फे 'आजची राजकीय पत्रकारिता आणि निवडणुका' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी चौधरी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.
चौधरी म्हणाल्या, "बहुमताच्या जोरावर १० वर्ष सरकार चालविणाऱ्या भाजपची भाषा लोकसभा निवडणुकीनंतर तत्काळ बदलली. "आम्ही आघाडी सरकार यशस्वीपणे चालवू', "सरकार बहुमताने होत असले तरी देश सहमतीवर चालतो' अशी भाजप नेत्यांची वक्तव्ये निकालानंतर पुढे येऊ लागली.सरकारचे नेतृत्व करताना आपल्या समवेतच्या पक्षांसमवेत तडजोडी कराव्या लागतात. परंतु, या सरकारमध्येही भाजपने महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवण्याची चाल खेळली, त्यामध्ये त्यांना यश आले आहे.'
चौधरी म्हणाल्या, "भाजपने चारशे जागा जिंकल्यास राज्यघटना बदलून आरक्षण रद्द होईल, हा मुद्या दलित समाजाने गांभीर्याने घेतला. परिणामी, उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या. या जागा त्यांना मिळाल्या असत्या, तर ते बहुमताजवळ पोचू शकले असते. परंतु, हेच चित्र मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, बिहारमध्ये दिसले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मान्य होतील, हे त्यांची आई सोनिया गांधी, बहिण प्रियांका गांधी यांनाही माहिती नव्हते, लोकसभेत राहुल गांधी यांना संवाद साधताना भाषा अडसर ठरू शकते, असेही चौधरी यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान शरद पवार यांनी त्यांच्या एका मुलाखती केले होते. असे असले तरीही त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे शक्यता वाटत नाही, असेही चौधरी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.