Crime esakal
पुणे

Pune Attack : पोलिसांचा वचक हवा; पालकांचीही जबाबदारी! हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रतिक्रिया

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असलाच पाहिजे. शाळा-महाविद्यालये, वसतिगृह आणि कोचिंग क्लासेसच्या परिसरात पोलिस गस्त वाढवावी.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असलाच पाहिजे. शाळा-महाविद्यालये, वसतिगृह आणि कोचिंग क्लासेसच्या परिसरात पोलिस गस्त वाढवावी. गुन्हेगारांना कठोर शिक्षेची तरतूद करायला हवी. पालकांचीही तेवढीच जबाबदारी असून, त्यांनी मुला-मुलींना पुरेसा वेळ दिला पाहिजे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केल्या.

सचिन पुणेकर - तरुण-तरुणी यांची मैत्री होते, आणि मग कधी त्याचे रूपांतर प्रेमात होते, कधी होत नाही. त्यामुळे मुलगा अथवा मुलगी यांनी नकार पचवायला शिकले पाहिजे. मुलींनी स्वतःचा बचाव करायला शिकले पाहिजे. नेहमी पोलिस किंवा त्या दोन मुलांसारखे देवदूत मदतीला नाही येणार.

सुदाम विश्वे - शाळा सुटताना स्थानिक गुंड शाळेच्या अवतीभोवती फेऱ्या मारतात. मुलींची छेडछाड, त्यांचा पाठलाग करणे, अश्लील बोलणे असे उद्योग करतात. अशा मुलांवर बीट मार्शलकडून वेळीच कारवाई केल्यास पुढील अनर्थ टळेल.

ॲड. ज्योती नवले - शहरात कोयत्याने दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षेची तरतूद करावी. प्रत्येक व्यक्तीला गुन्हा रोखणे ही सामाजिक जबाबदारी वाटली पाहिजे. गुन्हेगारी प्रवृती लक्षात येताच पालकांनी मुलांचे समुपदेशन केले पाहिजे.

राहुल माने - हल्ला करणाऱ्या मुलाचे छायाचित्र प्रसिद्ध न करण्याचा ‘सकाळ’चा निर्णय हा हिंसक मनोवृत्तीच्या व्यक्तींना सवंग प्रसिद्धी न मिळू देण्यासाठी संवेदनशील आहे. योग्य त्या न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांना शिक्षा मिळावी पण प्रसारमाध्यमांनी याबद्दल कोणताही किंतू परंतु मनात ठेवू नये, कारण यामध्ये पुराव्यासकट हा गुन्हेगार स्पष्टपणे यात सापडला होता.

मनीषा पवार - सध्या पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे मुलांना आपल्या कोणत्याही गरजेच्या वेळी आपले मित्र जवळचे वाटतात. त्यातूनच काही लोक गैरफायदा घेतात.

कैलास ढोले - पुणे हे एकतर विद्येचे माहेरघर आणि दुसरे म्हणजे ते शांतताप्रिय शहर समजले जाते. या शहरात कधी दंगली घडताना दिसत नाही. मात्र कोयता गँगने या शहराला बदनाम करण्याचे काम चालविले आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिक, व्यापारी, महिला, तरुणी हा वर्ग दहशती खाली आहे. पोलिस खात्याला सुद्धा कोयता गँगवाल्यांनी डोकेदुखी निर्माण केली आहे.

विजय ढमाले - तरुणीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्हच आहे. तसेच, या घटनेचे छायाचित्र ‘सकाळ’ने प्रसिद्ध न करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे.

श्रीनिवास नगरकर - एखाद्याचा बळी गेला तरी आरोपी काही दिवसांनी जामिनावर मुक्त होतात. अशा गुन्हेगारांना न्यायालयाने जामीन न देता कारागृहात पाठवावे.

के. नरेंद्र - शाळेत असतानाच स्वसंरक्षण हा विषय सक्तीचा करायला हवा. शारीरिक शिक्षण या विषयातच याचा समावेश असावा. कारण असे प्रकार यापुढे वाढत जाणार.

पोलिस दलाचा गुन्हेगारांवर जबरदस्त वचक असला पाहिजे. राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालू नये. आजची तरुण पिढी बुद्धिमान आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचा राष्ट्रहितासाठी योग्य वापर होण्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.

- रमेश वाळुंज, पुणे

बाहेरगावाहून अनेक होतकरू विद्यार्थी आपले भविष्य घडविण्यासाठी पुण्यात येतात. पालकांनी पुण्यातील नातेवाईक, परिचित व्यक्तींशी वेळोवेळी संपर्कात राहावे. अडचणी विचारात घेऊन मदत करावी. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिल्यास त्या स्वतःचे रक्षण करू शकतील.

- प्रदीप वळसंगकर, चिंचवड, पुणे

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांना असुरक्षित वाटू लागले आहे. पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. मुली आणि पालकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता वेळीच पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, तरच अशा गुन्हेगारांवर वचक बसेल.

- संदीप गुंड, गणेशरोड, ता. दौंड

सिनेमा आणि टीव्हीवरील मालिकांमधून प्रेमासाठी वाट्टेल तशी दृश्ये तरुण मनावर परिणाम करतात. त्याचेच अनुकरण सध्या होत आहे. समाजात वावरताना अमेरिकन संस्कृती इथे नको असे म्हणावेसे वाटते. अर्थात दोषी असणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी.

- राजन बिचे, बिबवेवाडी, पुणे

कोयता गॅंग दिसता क्षणीच गोळ्या घालायचे आदेश काढणे जरुरीचे आहे. कारण पूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर गाड्या अडवून लुटण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे रायगड व पुणे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तसे फर्मान काढल्याने ते बंद झाले. कायद्याची दहशत कमी झाली आहे.

- मनोज लाखे

मुलांना पुण्यात का नाही पाठवायचे? परराज्यातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनीवर लक्ष कोणी ठेवायचे? काही मुले-मुली रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर फिरत असतात. मध्यरात्रीनंतर रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.

- विलास शहा, पुणे-सातारा रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT