गेल्या आठवड्यात आरबीआयने दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लोकांनी आपल्याकडील नोटा वटवण्यास सुरूवात केली आहे. आरबीआयने नोटा बदलून देण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली असली, तरीही लवकरात लवकर आपल्याकडे असलेल्या नोटा खर्च करण्याचा कल लोकांमध्ये दिसून येत आहे.
खरेदी वाढली
बँकेत जाऊन नोटा बदलून घेण्याऐवजी, त्या वैध असेपर्यंत वापरून घेण्याचा ट्रेंड लोकांमध्ये दिसून येतोय. यामध्ये मग दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून अगदी महागड्या वस्तूंचा समावेश आहे. लोक अगदी आंबे घेण्यापासून ते महागडी घड्याळे घेण्यापर्यंतचे पर्याय वापरत आहेत.
आंबे खरेदीसाठी वापर
क्रॉफर्ड मार्केटमधील एका आंबे व्यापाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपासून लोकांनी दोन हजारांच्या नोटा देऊन आंबे खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. एका दिवसात आपल्याला अशा आठ ते दहा नोटा मिळत असल्याचे त्याने सांगितले. "आपण या नोटा घेण्यास नकार देत नाही. ३० सप्टेंबरपूर्वी आपण एकत्रितपणे या नोटा बँकेत जमा करू", असं या व्यापाऱ्याने म्हटलं.
महागड्या घड्याळांचा खप वाढला
दोन हजारांच्या नोटा खपवण्याच्या दृष्टीने लोक महागड्या वस्तूंची खरेदी करत आहेत. राडो घड्याळाच्या विक्रीमध्ये यामुळे वाढ झाल्याची माहिती मुंबईतील स्टोअर मॅनेजर मार्टिस यांनी दिली. यापूर्वी दिवसाला एक किंवा दोन घड्याळांची विक्री होत होती. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिवसाला ३-४ घड्याळांची विक्री होत आहे. खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर दोन हजारांच्या नोटांचा वापर करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
मंदिरांमध्ये दान वाढले
दोन हजारांच्या नोटा खपवण्यासाठी लोकांनी आता देवाचा धावाही करणं सुरू केलं आहे. मंदिरांमध्ये असणाऱ्या दानपेटीमध्ये दोन हजारांच्या नोटा टाकण्याचं प्रमाण वाढलं आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगरा जिल्ह्यात असणाऱ्या ज्वाला देवीच्या मंदिरातील दानपेटीत दोन हजार रुपयांच्या तब्बल ४०० नोटा दिसून आल्या.
झोमॅटोचाही वापर
आरबीआयच्या घोषणेनंतर सोमवारी झोमॅटोने सांगितलं, की लोक मोठ्या प्रमाणात ऑर्डर करून पेमेंट करण्यासाठी २००० रुपयांच्या नोटांचा वापर करत आहेत. झोमॅटोने सांगितलं की शुक्रवारपासून झालेल्या कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर्सपैकी ७२ टक्के लोकांनी पेमेंट करण्यासाठी दोन हजारांची नोट वापरली.
दरम्यान, २३ मेपासून बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यात येत आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलता येणार आहेत. या नोटा चलनातून बाद झाल्या असल्या, तरीही ३० सप्टेंबरपर्यंत त्या व्यवहारात वापरता येणार असल्याचंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.