-अमित रेठरेकर (क्वालिफाइड कंपनी सेक्रेटरी)
सध्या शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरभक्कम परताव्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधीचा गंडा घातल्याच्या घटनांनी सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली आहे. यात दरमहा चक्क ५ ते ७ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईसारख्या ठिकाणी एका सल्लागाराने उच्चशिक्षित वर्गास अशाच दरमहा १-३ टक्के परताव्याच्या नावाखाली गंडा घातला होता आणि नंतर पलायन केले होते.
अशा प्रकारे फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येत असतात, तरीही पुनःपुन्हा नव्याने योजना आणल्या जातात आणि लोकही फसतात. आपण कष्टाने मिळवलेली संपत्ती व्यवस्थित वाढावी, सुरक्षित राहावी असे वाटत असेल, तर अशा अतिपरताव्याच्या मोहापासून दूर राहणे हाच एकमेव मार्ग आहे.
बँकेत बचत खात्यात असलेल्या ठेवींवर वर्षाला दोन ते तीन टक्के व्याज मिळते, मुदत ठेवींवर वर्षाला सात ते आठ टक्के व्याज मिळते, अशावेळी दर महिन्याला पाच ते सात टक्के परतावा म्हणजे लॉटरीच लागण्यासारखे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना अशा ‘स्कीम’ची भूरळ पडते आणि लोक या जाळ्यात अडकतात. यामागे अतीपरताव्याचा लोभ, इतरांपेक्षा जास्त परतावा आपल्याला मिळावी या असूयेचा प्रभाव असतो. अनेकदा याच भावनेच्या आहारी जाऊन लोक अशा दिखावू योजनांना बळी पडतात.
दरमहा २-३ टक्के किंवा ५ ते ७ टक्क हे जादुई शब्द एकदा मनात संचारले, की मग आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत, जीवनशैली, जोखीम, क्षमता यांचे अवलोकन करून केलेल्या आर्थिक नियोजनाचा चष्मा बाजूला ठेवून, अतीलोभाच्या लालसेने डोळे झाकून गुंतवणूक केली जाते आणि संपत्ती वाढण्याऐवजी आहे, तीदेखील गमावण्याची वेळ येते.
दरमहा २ टक्के परताव्याचे गणित
दरमहा २ टक्के परतावा दिला जाईल, असे सांगितले जाते तेव्हा सर्वसामान्य व्यक्ती सहजपणे वार्षिक २४ टक्के परतावा असे गणित मांडते आणि इथेच फसगत होते. दरमहा २ टक्के म्हणजे दरसाल दरशेकडा २४ टक्के असा हिशेब नाही, तर चक्रवाढ पद्धतीने २६.८ टक्के वार्षिक परताव्याइतके आहे. सध्या लोकप्रिय गुंतवणूक पर्याय असलेल्या म्युच्युअल फंड योजनांपैकी काही निवडक योजनांनी वार्षिक २३ ते २४ टक्के परतावा दिला आहे. इतर योजनांनी सर्वसाधारणपणे १५ ते १८ टक्क्यांदरम्यान परतावा दिला आहे. याचाच अर्थ नोंदणीकृत आणि नियामकांच्या देखरेखीखाली कार्यरत अशा या फंड योजनादेखील सरासरी १८ टक्क्यांहून जास्त परतावा देऊ शकत नाहीत. हे गुंतवणूकदारांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
एक काल्पनिक कथा .....
एक स्कीमगाव नावाचं गाव होतं. इथल्या एका हुशार व्यापाऱ्याने ‘जोखीम मुक्त परतावा’ देण्याचा दावा करीत एक गुंतवणूक योजना आणली. दर महिन्याला आपल्या मागील महिन्यात झालेल्या निव्वळ नफ्याच्या आधारे गुंतवणूकदारांचा नफ्यातील वाटा निश्चित केलेल्या तारखेला दिला जाईल, असे सांगून त्याने अनेकांचा विश्वास संपादन केला. त्याचे अलिशान ऑफिस, राहणीमान, आकर्षक भव्य जाहिराती आणि त्याच्याच साथीदारांद्वारे भरभक्कम परतावा मिळाल्याचा प्रचार याआधारे लोकांवर चांगलाच प्रभाव पडत असे.
सुरुवातीच्या काळात गुंतवणूक करणाऱ्यांना त्याने दरमहा २ टक्के परतावादेखील दिला. नव्याने होणाऱ्या गुंतवणुकीतून तो आधीच्या गुंतवणूकदारांना परतावा देत असे, असे चक्र काही काळ त्याने सुरू ठेवले. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर चांगलाच विश्वास बसला. गुंतवणूकदारांची रीघ लागू लागली. एक दिवस रातोरात हा व्यापारी सर्वांचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झाला. अतीमोहापोटी त्याच्याकडे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना, तेलही गेले आणि तूपही गेले, हाती धुपाटणे आले असे म्हणत बसण्याची वेळ आली.
त्यामुळे दरमहा २ ते ३ टक्के किंवा त्याहून अधिक परतावा देतो, असे कोणी सांगितले तर सावध व्हा! कोणतीही गुंतवणूक करताना ‘भांडवलाच्या परताव्यापेक्षा भांडवलाची परतफेड अधिक महत्त्वाची’ हा गुरुमंत्र कायम लक्षात ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.