UPI Payment Facility: ‘यूपीआय’चा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन नुकतेच म्हणजे सहा एप्रिल रोजी द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेने यूपीआय पेमेंट प्रणालीची व्याप्ती आणखी वाढविली आहे.
आता ग्राहक आपल्या पूर्व मंजूर कर्जखात्याशी (प्री सॅंक्शन्ड क्रेडिट लाइन) आपले यूपीआय अॅप जोडून या खात्यातून यूपीआयद्वारा पेमेंट करू शकणार आहेत किंवा यूपीआयद्वारा पेमेंट घेऊ शकणार आहेत. ही या वर्षीच्या पहिल्या पतधोरणातील एक महत्त्वाची बाब आहे.
मात्र ही सुविधा सर्वप्रकारच्या कर्जांसाठी वापरता येणार नाही (उदा: डिमांड लोन/टर्म लोन), तर फक्त पूर्व मंजूर कर्जखात्याशी (प्री सॅंक्शन्ड क्रेडिट लाईन) ज्याला बँकेत कॅश क्रेडिट मर्यादा असे म्हणतात.
या सुविधेमध्ये कर्जदार बँकेने मंजूर केलेल्या रकमेपर्यंत खात्यातील रक्कम कधीही काढू शकतो किंवा या रकमेपर्यंत पेमेंट करू शकतो. तसेच या खात्यात काही रक्कम जमा झाल्यास नावे रक्कम कमी होते आणि पुन्हा मंजूर मर्यादेपर्यंत खात्यातील रक्कम काढता येते. याला ‘रिव्हॉलव्हींग लिमिट’ असे म्हणतात. (Latest Marathi News)
बँका अशा प्रकारची ‘प्री सॅंक्शन्ड क्रेडिट लाइन’ आपल्या ग्राहकास त्याची क्षमता व गरज विचारात घेऊन मंजूर करतात. याचा उपयोग ग्राहकांना प्रामुख्याने खेळते भांडवल म्हणून करता येतो. बँकातील हा एक प्रचलित व मोठ्या प्रमाणावर मागणी असलेला कर्ज प्रकार आहे.
‘प्री सॅंक्शन्ड क्रेडिट लाइन (कॅश क्रेडिट मर्यादा) ही सुविधा वापरताना मंजूर मर्यादेपैकी जितकी रक्कम व जितक्या दिवसांसाठी वापरली असेल त्यानुसार व्याज आकारणी केली जाते. (संपूर्ण कर्ज मर्यादेवर व्याज आकारणी होत नाही.)
विनामूल्य सेवा
‘यूपीआय’च्या अशा वापरास कोणत्याही प्रकारचे शुल्क असल्याचा उल्लेख रिझर्व्ह बँकेने केलेला नाही. अशा रीतीने आपल्या कॅश क्रेडिट खात्यावरील व्यवहार ‘यूपीआय’द्वारे केल्याने आपली कर्ज मर्यादा अधिक चांगल्या प्रकारे वापरता येईल; शिवाय आपल्या सोयीनुसार ३६५ दिवस केंव्हाही वापरता येईल व होणाऱ्या व्यवहाराची पोहोच त्वरित मिळेल.
व्यवहार करण्यावरील खर्चही कमी होईल. अशाप्रकारे आपले रूपे क्रेडिट कार्डसुद्धा ‘यूपीआय’ला जोडून क्रेडिट कार्डची मर्यादाही आता वापरता येणार आहे. सध्या ही सुविधा फक्त रूपे क्रेडिट कार्डपुरतीच असली, तरी नजीकच्या भविष्यात ही मास्टर व व्हिसा कार्डसाठीसुद्धा उपलब्ध होऊ शकते.
थोडक्यात, इतके दिवस ‘यूपीआय’ सुविधा केवळ बचत खात्यासाठी आपल्या खात्यातील शिल्लक रकमेपर्यंतच उपलब्ध होती. ती आता आपल्या कॅश क्रेडिट खात्यास; तसेच रूपे क्रेडिट कार्डच्या मंजूर मर्यादेपर्यंत उपलब्ध झाली आहे. या सुविधेचा वापर करणे ग्राहकाच्या निश्चितच हिताचे आहे.
(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.