अर्थबोध
पुरुषोत्तम बेडेकर
आजच्या काळात बचत करून घर, गाडी खरेदी करण्यापेक्षा, कर्ज घेऊन खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. कर्ज देण्यासाठी बँका, वित्तीय संस्थामध्ये प्रतिस्पर्धा सुरू असल्याने कर्जेही त्वरित मिळतात. कोणतेही कर्ज देताना तुमचे पतमूल्यांकन (क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर) तपासले जाते. आपल्याला लगेच कर्ज घ्यायचे असो किंवा नसो आपले पतमूल्यांकन काय आहे? याविषयी माहिती घेणे आणि ते चांगले ठेवण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण सिबिल स्कोअर चांगला नसेल, तर वित्तीय संस्था कर्ज नाकारू शकतात किंवा जास्त व्याजदर लावू शकतात; तसेच कर्जही कमी मिळते.
सिबिल स्कोअरची संकल्पना
क्रेडिट स्कोअर म्हणजेच आर्थिक भाषेत याचे लोकप्रिय नाव आहे ‘सिबिल स्कोअर’. वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्यवहारांच्या नोंदीवर तो अवलंबून असतो. हा ३०० ते ९०० या पट्ट्यात असतो. तुमचा स्कोअर ७५०च्या आसपास असेल, तर तुमचे कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते.
सिबिल स्कोअरसाठी खालील निकष वापरले जातात.
परतफेडीचा इतिहास
आपण कर्जांची परतफेड वेळेत केली आहे का? हा आपले पतमूल्यांकन ठरवण्यासाठीचा सर्वांत महत्त्वाचा निकष असतो. परतफेडीमधील हलगर्जीपणा किंवा अनियमितता यांचा आपल्या स्कोअरवर विपरीत परिणाम होतो. परतफेडीमध्ये किती उशीर झाला, अशा घटना किती वेळा घडल्या याचाही विचार केला जातो. यासाठी स्कोअरमध्ये ३५ टक्के वेटेज असते. कर्जफेडीतील अनियमितता टाळण्यासाठी परतफेड स्वयंचलित करणे व खात्यामध्ये पुरेशी शिल्लक ठेवणे महत्त्वाचे आहे.
कर्जाचा वापर
उपलब्ध पतमर्यादेचा वापर किती होतो, याचाही विचार केला जातो. उदाहरणार्थ, क्रेडिट कार्ड लिमिट सातत्याने पूर्णपणे वापरणे, हे एक बेजबाबदार आर्थिक वर्तन मानले जाते. या निकषासाठी ३० टक्के वेटेज आहे.
कर्ज वापराचा इतिहास
आपण किती वर्षांपासून कर्ज घेत आहात; तसेच सर्व कर्जांच्या परतफेडीचा इतिहास यांचा विचार करून स्कोअर दिला जातो. वेगवेगळ्या कारणांसाठी घेतलेली कर्जे व त्यांच्या परतफेडीचा चांगला इतिहास, यांची स्कोअर सुधारण्यास मदत होते. या निकषासाठी १५ टक्के वेटेज आहे.
नव्या कर्जासाठी चौकशी
वेगवेगळ्या कर्जांसाठी विविध वित्तीय संस्थाकडे केलेले अर्ज हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम करतात. असे कर्जदार व त्यांना दिलेले कर्ज जोखमीचे मानले जाते. या निकषासाठी १० टक्के वेटेज आहे.
कर्जाचे प्रकार
तुमच्या कर्जांपैकी किती कर्जे तारण असलेली आणि किती विनातारण आहेत, याचाही विचार केला जातो. या दोन्ही कर्जांचा समतोल साधलेला असेल, तर ते योग्य मानले जाते. या निकषासाठी १० टक्के वेटेज आहे.
पतमूल्यांकन सुधारण्यासाठी...
कर्जे घ्या; पण परतफेडीत नियमितता ठेवा. कर्ज घेतल्यामुळे तुमचा कर्ज इतिहास तयार होतो.
कर्जे आवश्यकतेनुसार व परतफेडीच्या क्षमतेनुसार घ्या.
परतफेड वेळेवर किंबहुना वेळेआधीच केलेली जास्त चांगली.
परतफेड स्वयंचलित करा व त्यासाठी खात्यात पुरेशी शिल्लक ठेवा.
कर्जामध्ये तारण व विनातारण कर्जे यांचे योग्य संतुलन ठेवा.
घेतलेली कर्जे व जामीनदार असलेली कर्जे यांच्या परतफेडीचा नियमित आढावा घ्या.
सिबिल स्कोअर कमी झाल्यास,तो सुधारण्यास दीर्घकाळ लागतो. त्यामुळे त्याकडे नियमित लक्ष द्या.
आपला संपर्क क्रमांक, मेल, पत्ता यात बदल झाला असेल, तर वित्तीय संस्थेला कळवा.
(लेखक बँकिंगविषयक तज्ज्ञ आणि
सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.