विज्ञान
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संबंधी नवीन योजनांचा या अर्थसंकल्पात समावेश नाही. हा अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे तशी अपेक्षाही करता येत नाही. असे असले तरी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संबंधी योजनांना चालना देण्यात आली आहे. सेमी कंडक्टर दर्शक निर्मितीसाठी असणारे अर्थसाह्य ४,६४५ हजार कोटींवरून ६,२०० हजार कोटी रुपये एवढे करण्यात आले आहे. तसेच सौर ऊर्जानिर्मितीसाठी ३५०० कोटी, हायड्रोजन निर्मितीसाठी ३९० कोटी आणि उत्पादन प्रोत्साहनासाठी १५० हजार कोटी वाढ करण्यात आली आहे.
एक कोटी घरांना प्रत्येकी ३०० युनिट एवढी वीज मोफत पुरविण्याची योजना आहे. नीलक्रांती योजनेला भरीव मदत देऊ केली आहे. यासाठी ३२५ हजार कोटी एवढी वाढ करण्यात आली आहे. यातून मत्स्यनिर्यात दुप्पट करण्याची आणि तरुणांना रोजगार पुरविण्याची योजना आहे.
स्टार्ट अपसाठी एक लाख कोटींचा निधी उपलब्ध केला असून त्यातून ५० वर्ष मुदतीचे कर्ज उपलब्ध होणार आहे. कर्जावरील व्याजावर मिळणाऱ्या सुटीची मुदत एक वर्षाने वाढविण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, ब्लॉक चेन तंत्रज्ञान या आणि अशा तंत्रज्ञानासाठी अपेक्षित असलेली विशेष तरतूद यात केलेली नाही.
तंत्रज्ञानाला प्राधान्य अपेक्षित
जुलैमध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी भरीव तरतूद अपेक्षित आहे. त्यात आर्थिक व्यवहारासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाला प्राधान्य द्यावे लागेल. यात अंकीय (डिजिटल) पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, अंकीय व्यवहार याबरोबरच माहिती सुरक्षा, माहितीचा उद्योगात उपयोग यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. ब्लॉक चेन या तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत आहे. त्याच्या उपलब्धतेला चालना द्यावी लागेल.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा झपाट्याने विकास होत आहे. त्यात आपला सहभाग वाढविणे आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान वापरून स्वयंचलित वाहने आणि इतर प्रक्रिया विकसित कराव्या लागतील. त्यात शिक्षणाचाही समावेश होऊ शकेल. डिझाईन (रेखाटन) हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. त्यासाठी या क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतात हे क्षेत्र अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. याचा विकास होण्यासाठी त्याचा शिक्षणात अंतर्भाव करणे जरुरीचे आहे.
आतापासूनच तयारी आवश्यक
अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढचे पाऊल टाकण्यासाठी गगनयान मोहीम आखली आहे. अंतराळवीरांना चंद्रावर पाठविण्यासाठी आतापासून तयारी सुरू आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल. यात मानवाला घेऊन जाणारे यान, अंतराळवीरांसाठी लागणारा पोशाख, यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून परत आणण्याची क्षमता आदींचा समावेश आहे. मूलभूत विज्ञानात पुंजीय संगणन (क्वांटम कॉम्प्युटिंग ) क्षेत्राचा विकास करावा लागेल.
औषधनिर्माण क्षेत्र हे भारतासाठी लाभदायक ठरू शकते. लस आणि कमी किमतीत औषधे निर्माण करण्यात भारत आघाडीवर आहे. मात्र स्वतंत्रपणे औषधनिर्मिती अद्याप दृष्टिपथात नाही. त्याला चालना मिळाल्यास ते भारतासाठी वरदान ठरू शकते. ‘जय जवान, जय किसान’ या लालबहादूर शास्त्री यांच्या घोषणेत आधी ‘विज्ञान’ आणि आता ‘अनुसंधान’ यांचीही भर घालण्यात आली आहे.
(लेखक पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक व माजी कुलगुरु आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.