काही करदात्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा अधिक नसताना आणि सार्वजानिक न्यासासारख्या करदात्यांचे बहुतांश उत्पन्न करमुक्त असताना प्राप्तिकर कायद्यातील उद्गम करकपातीच्या (टीडीएस) तरतुदीनुसार त्यांच्या उत्पन्नातून सक्तीची करकपात केली जाते. अनिवासी नागरिकांच्या बाबतीत त्यांचे सर्व मुख्य उत्पन्न परदेशातून मिळालेले असतानाही भारतात मिळालेल्या उत्पन्नातून करकपात करावी लागते.
त्यामुळे अशा करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून कापला गेलेला कर परत मिळविण्यासाठी वर्षभर थांबून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करून तो मिळवावा लागतो. यात विलंबदेखील होण्याची शक्यता असते. याखेरीज ज्यांचे उत्पन्न करपात्र नाही, अशा करदात्यांकडून एक तर प्राप्तिकर जमा करणे योग्य नसताना जमा केला जातो.
काहींचे उत्पन्न निम्न करदरात करपात्र असताना त्यांच्याकडून अधिक कर वसूल होणे योग्य नाही म्हणून अशा करदात्यांना न्याय देण्यासाठी कमी किंवा शून्य दराने करकपात करण्याची परवानगी देणारे ‘प्रमाणपत्र’ प्राप्तिकर विभागामार्फत जारी करण्याची तरतूद कायद्यांतर्गत उपलब्ध आहे. पगार, मुदत ठेवींवरील व्याज, लाभांश, रोख्यांवरील व्याज, घरभाडे, व्यावसायिक किंवा तांत्रिक सेवांसाठीचे शुल्क, स्थावर मालमत्तेचे अनिवार्य संपादन केल्यावर दिलेली नुकसानभरपाईची रक्कम यासारख्या उत्पन्नाबाबत हे प्रमाणपत्र मिळू शकते.
पारदर्शक ई-प्रक्रिया
पूर्वी प्रत्यक्ष संपर्काने होणारी ही प्रक्रिया तेवढी पारदर्शक नव्हती व करदात्यांना असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्राप्तिकर विभागाचे खेटे मारावे लागत होते. तथापि, आता या करदात्यांच्या या मागणीच्या सुलभतेसाठी प्राप्तिकर विभागाने ई-प्रक्रिया अंतिम केली असून, ती पूर्णतः कार्यान्वितही झाली आहे. त्यामुळे आता करदाते कमी किंवा शून्य ‘टीडीएस’साठी (उद्गम करकपात) पात्र असल्यास, हे प्रमाणपत्र मिळवू शकतात.
कधी निघणार अर्ज निकाली?
प्राप्तिकर विभागाला, ज्या महिन्यात सर्व बाबतीत पूर्ण असलेला अर्ज प्राप्त झाला आहे, त्या महिन्याच्या अखेरीपासून ३० दिवसांच्या आत मूल्यांकन अधिकाऱ्याने १९७ अंतर्गत अर्ज निकाली काढणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता असे प्रमाणपत्र करदात्यास आवश्यक असेल, तर १५ मार्च २०२४ पूर्वी अर्ज करावा, असे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. नंतर अर्ज दाखल झाल्यास प्रमाणपत्राच्या तारखेनंतरचेच प्रमाणपत्र मिळू शकेल पूर्ण वर्षाचे नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे
प्राप्तिकर अधिकारी करदात्याच्या अंदाजे उत्पन्नावर असणारा देय कराची पडताळणी करतील, याखेरीज मागील तीन वर्षांचा देय कर, विद्यमान दायित्व व आगाऊ करभरणा या निकषांवर आधारित विद्यमान व अंदाजित करदायित्व निश्चित करतील. करदात्याला मागील चार वर्षांतील प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अट आहे. या सर्वांच्या आधारे मूल्यांकन अधिकारी प्रमाणपत्र जारी करायचे की नाही हे ठरवू शकतात. प्रमाणपत्र जारी करायचे असेल, तर ते विशिष्ट कालावधीसाठीच असते. या सुविधेचा करदात्यांनी जरूर लाभ घ्यावा.
प्रमाणपत्र मिळविण्यासाठी...
प्राप्तिकर संचालनालयाच्या अधिसूचनेनुसार, प्रथम, करदात्याला ‘ट्रेसेस’ (www.tdscpc.gov.in) वर ‘पॅन’सह नोंदणी करणे आवश्यक आहे. लॉग-इन केल्यानंतर, कलम १९७ अंतर्गत शून्य किंवा कमी ‘टीडीएस’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी फॉर्म १३ पूर्ण भरून व डिजिटलसह सहीचा वापर करून तो दाखल करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
1) ट्रेसेसमध्ये लॉग-इन करा आणि ‘स्टेटमेंट्स/फॉर्म’ टॅब अंतर्गत ‘फॉर्म १३ साठी विनंती’ निवडा.
2) फॉर्म १३ मध्ये मागितलेली सर्व माहिती, योग्य तपशील भरा.
3) योग्य कागदपत्रे अपलोड करून डिजिटल स्वाक्षरी किंवा ‘ईव्हीसी’ वापरून फॉर्म दाखल करा.
4) पुढील प्रक्रिया स्वयंचलित असेल. करकपात न करण्याची वा कमी दराने करण्याची परवानगी देणारे ‘प्रमाणपत्र’, जी व्यक्ती करकपात करीत आहे, तिला परस्पर विभागामार्फत दिले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.