नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) एप्रिल २०२४ मध्ये सदस्यसंख्येत विक्रमी १८ लाख ९२ हजारांची भर घातली आहे, असे आज जाहीर झालेल्या वेतनश्रेणीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. एप्रिल २०१८ मध्ये प्रथम वेतनश्रेणी आकडेवारी प्रकाशित झाल्यापासून या महिन्यातील ही सर्वाधिक वाढ आहे, असे कामगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
मार्च २०२४च्या तुलनेत एप्रिलमध्ये सदस्यांच्या संख्येत ३१.२९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर वार्षिक तुलनेत त्यात दहा टक्के वाढ झाली आहे. वाढलेल्या रोजगाराच्या संधी, कर्मचाऱ्यांमध्ये फायद्यांबाबत वाढती जागरुकता व ‘ईपीएफओ’ने राबवलेल्या उपक्रमांमुळे संख्या वाढल्याचे ‘ईपीएफओ’ने म्हटले आहे.
एप्रिल २०२४ मध्ये सुमारे ८.८७ लाख नव्या सदस्यांनी नोंदणी केली असून, यात १८ ते २५ वर्षे वयोगटातील कर्मचाऱ्यांचे प्राबल्य दिसून येते. त्यांचे प्रमाण ५५.५० टक्के आहे. संघटित कर्मचाऱ्यांमध्ये सामील होणारे बहुतेक लोक तरुण असून, प्रामुख्याने प्रथमच नोकरी शोधणारे आहेत, हे यावरून स्पष्ट झाले आहे. या महिन्यात एकूण महिला सदस्यांची संख्या सुमारे ३.९१ लाख होती.
मार्चच्या तुलनेत सुमारे ३५.०६ टक्के वाढ झाली आहे. महिला सदस्यांची वाढ हे मनुष्यबळातील वैविध्य व समावेशकता दर्शवते. सुमारे १४.५३ लाख सदस्य बाहेर पडले आणि नंतर पुन्हा सामील झाल्याचेही आढळले आहे. या सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्या बदलल्या आणि ते पुन्हा ‘ईपीएफओ’च्या कक्षेत समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये सामील झाले, तसेच त्यांनी फंडातील जमा रक्कम हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडला, त्यामुळे त्यांचे सामाजिक सुरक्षा संरक्षण वाढले आहे, असेही ‘ईपीएफओ’ने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात व हरियाणामध्ये सदस्यांची वाढ सर्वाधिक असून, त्यांचा हिस्सा जवळपास ५८.३० टक्के आहे. तज्ज्ञसेवा, व्यापार उद्योग क्षेत्रातील सदस्यांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवते. एकूण सदस्यत्वापैकी ४१.४१ टक्के वाढ ही मनुष्यबळ पुरवठा, कंत्राटदार, सुरक्षा आदी सेवाक्षेत्रातील आहे.
ठळक वैशिष्ट्ये...
नव्या सदस्यांची संख्या ८.८७ लाख
नव्या महिला सदस्य २.४९ लाख
१८ ते २५ वर्षे वयोगटातील सदस्यांचे प्रमाण ५५.५० टक्के
१४.५३ लाख सदस्यांनी केली पुन्हा नोंदणी
सेवा क्षेत्रातील सदस्यांमध्ये ४१.४१ टक्के वाढ
महाराष्ट्रात सर्वाधिक २०.४२ टक्के सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.