आपल्या शेअर बाजाराच्या निफ्टी, सेन्सेक्स या निर्देशांकामध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअरचे मोठे वजन (वेटेज) आहे. या शेअरच्या भावामधील चढ-उताराचा निर्देशांकांमधील चढ-उतारांवर मोठा प्रभाव पडत असतो. गेल्या तीन वर्षांमध्ये निफ्टी, सेन्सेक्सने मोठी मजल मारली.
परंतु, एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये एचडीएफसी लि.चे विलीनीकरण, गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे नसलेले आर्थिक निकाल यामुळे फारशी वध-घट झालेली नाही. तरीही हा शेअर गुंतवणूकदारांचा लाडका शेअर आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या तिमाहीचे आर्थिक निकाल जानेवारी २०२४ मध्ये प्रसिद्ध झाल्यावर ते अपेक्षेप्रमाणे नसल्याने १७०० रुपयांच्या आसपास असलेल्या शेअरच्या भावामध्ये सुमारे १५ टक्के घट झाली.
शुक्रवारी (१५ मार्च) शेअरचा भाव १४५२ रुपये होता. या पार्श्वभूमीवर या बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करावी, की या बँकेचे शेअर खरेदी करावेत, या मुद्द्याचा राजेश आणि अनिल या दोन मित्रांमध्ये झालेल्या संवादातून ऊहापोह केला आहे. व्यक्तींची नावे आणि संवाद केवळ उदाहरणासाठी घेतले आहेत.
राजेश : सध्याच्या काळात कुठे गुंतवणूक करावी, असा प्रश्न पडतो. शेअर बाजारात चढ-उतार दिसत असले तरी तो एकंदरीत तेजीमध्ये आहे...
अनिल : हो, शेअर बाजार, सोने, रिअल इस्टेटमध्ये सुद्धा तेजी आहे. तसेच बँकांमधील मुदत ठेवींचे व्याजदरसुद्धा उच्च पातळीवर आहेत.
राजेश : मी नुकतीच एचडीएफसी बँकेत दोन वर्षांसाठी ७ टक्के व्याजदराने ४ लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली आहे. या बँकेच्या शेअरने १४०० रुपयांच्या पातळीच्या वर भक्कम आधार घेतला आहे, असे दिसते. तसेच काही परकी गुंतवणूकदारांनी आता या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही, असे सुचवले आहे. म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करत आहेत. हे पाहता मी या बँकेत केलेली मुदत ठेव मोडून येणारी रक्कम या बँकेच्या शेअरमध्ये गुंतवावी का?
अनिल : बँकेतील मुदत ठेव म्हणजे ‘डेट’ ही निश्चित परताव्याची हमी देऊ शकते. ही मुदत ठेव तू कोणत्या उद्देशाने केली आहेस? तातडीने लागणाऱ्या रकमेसाठी केली आहे का? शेअरमधील गुंतवणूक म्हणजे इक्विटी. तुझ्या खरेदीनंतर अशा शेअरमधून आगामी काळात मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा जास्त परतावा मिळू शकेल, परंतु शेअरचा भाव तुझ्या खरेदीच्या भावाच्या खाली आला, तर काय निर्णय घेणार? याचा विचार कर.
गुंतवणुकीमध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘ॲसेट ॲलोकेशन.’ थोडक्यात, ‘सर्व अंडी एका टोपलीमध्ये ठेवायची नाहीत.’ आपल्याकडील किती रक्कम ‘डेट’मध्ये आणि किती रक्कम ‘इक्विटी’मध्ये; तसेच इतर पर्यायांमध्ये गुंतवायची, या सर्वांचा आपले उत्पन्न, वर्तमान; तसेच भविष्यातील खर्च, म्हातारपणाची पुंजी, जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन ॲसेट लोकेशन’ ठरवावे लागते. नंतर जर विविध पर्यायांमध्ये केलेल्या गुंतवणुकीत बदल केला, उदा. मुदत ठेवीची रक्कम इक्विटीमध्ये, तर यातून कदाचित गुंतवणुकीचा उद्देश आणि ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यात अडचण येऊ शकते.
राजेश : अतिशय महत्त्वाचे मुद्दे सांगितलेस. धन्यवाद मित्रा...!
(डिस्क्लेमरः हा लेख केवळ शैक्षणिक उद्देशाने लिहिला असून, वाचक वा गुंतवणूकदारांनी स्वतः अभ्यास करून आणि प्रमाणित आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेऊन, स्वतःच्या जबाबदारीवर गुंतवणुकीबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.