Akshay Tritiya 2024: सोन्याचा भाव सार्वकालिक उच्चांकापासून सुमारे ३००० रुपयांनी कमी झाल्यामुळे आता ग्राहकांना अक्षय्य तृतीयेच्या (शुक्रवारी) शुभमुहूर्तावर सोने खरेदीची संधी आहे. गेल्या वर्षी २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय्य तृतीया होती, तेव्हापासून आतापर्यंत सोन्याने १६ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यावेळी दहा ग्रॅम सोन्याचा भाव ५९,८४५ रुपये होता, तो आता ७१,१०० रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरात ११,३०० रुपयांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्यातील गुंतवणूक सात ते १९ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते.
एमसीएक्सवर सोन्याचे जूनमधील वायदे बुधवारी प्रति दहा ग्रॅमसाठी ७३,९५८ रुपयांच्या उच्चांकावरून खाली येऊन ७१,१०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. गेल्या अक्षय्य तृतीयेपासून या अक्षय्य तृतीयेपर्यंतच्या सोन्याच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, सोन्याने जवळजवळ १८.५ टक्के परतावा दिला आहे.
गुंतवणूकदारांनी गेल्या पाच वर्षांमध्ये अक्षय्य तृतीयेच्या दरम्यान सोन्यात गुंतवणूक केली असेल, तर त्यांचा वार्षिक सरासरी परतावा सुमारे १७.५० टक्के असेल, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले. इस्त्राईल-हमास युद्धामुळे निर्माण झालेला भू-राजकीय तणाव आणि फेडची व्याजदर कपातीबाबतची अनिश्चितता यामुळे यंदा सोन्यातील भाववाढीला चालना मिळाली आहे आणि यापुढेही हाच कल राहण्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
चीन मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्यामुळे भाववाढीला चालना मिळाली, असे रिद्धीसिद्धी बुलियन्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले. मात्र, आता पुढील काही दिवसांत भाव घटण्याची अपेक्षा आहे.
त्यामुळे ज्यांनी अद्याप सोने खरेदी केलेले नाही, त्यांनी या महिन्यात भाव कमी होताच खरेदी करत राहावे, असे कोठारी यांनी सांगितले. सोन्याचे भाव वाढल्याने लोक कमी वजनाचे सोन्याचे दागिने खरेदी करत आहेत, मात्र मागणीत काहीही घट झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या दहा वर्षांतील एका अक्षय्य तृतीयेपासून दुसऱ्या अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याच्या भावातील चढ-उतार लक्षात घेतल्यास संमिश्र कामगिरी दिसून येते, असेही अनुज गुप्ता यांनी सांगितले. वर्ष २०१४ मधील अक्षय्य तृतीयेपासून २०१५ मधील अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याचा भाव १२ टक्क्यांनी कमी झाला होता.
२०१७ मध्ये तो आणखी ३.२३ टक्क्यांनी उतरला. मात्र, या दरम्यानच्या काळात सोन्याने दोन अक्षय्य तृतीयेदरम्यान आठ वेळा सकारात्मक परतावा दिला असून, २०२० मध्ये सर्वाधिक ३२ टक्के परतावा दिला. वर्ष २०२३ मध्ये आणि यावेळीही परतावा दुहेरी अंकात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
''सोन्यात मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा दृष्टिकोन बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी भावातील सुधारणा ही एक चांगली संधी आहे. मात्र, एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचा विचार करणे लाभदायी ठरेल. पुढील अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे ८० ते ८५ हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भाव कमी झाल्यावर गुंतवणूक करण्याची संधी घ्यावी.''
- अनुज गुप्ता, प्रमुख कमोडिटी विभाग, एचडीएफसी सिक्युरिटीज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.