मुंबई - द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात रोजगारसंधीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. विशेषतः रिटेल कर्जपुरवठा व्यवसायातील नोकऱ्यांची संख्या वाढली असल्याचे ‘टीमलीज सर्व्हिसेस’ने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. कंपनीच्या मोठ्या ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यात ४५ हजारांहून अधिक तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, क्रेडिट कार्ड आणि मायक्रो फायनान्सिंग या क्षेत्रातील रोजगार संधीमध्ये चांगली वाढ नोंदवली आहे. रिटेल कर्जपुरवठा क्षेत्राने एकूण रोजगार आकडेवारींमध्ये २९ टक्क्यांनी वाढ दर्शवली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांनी आर्थिक वर्ष २०२३ व आर्थिक वर्ष २०२४ दरम्यान अनुक्रमे २१ टक्के आणि २६ टक्क्यांनी वाढ दाखवली आहे.
निमशहरी आणि छोट्या शहरांमध्ये रिटेल कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांचे जाळे वाढत असल्याने या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. रोजगार वाढलेल्या द्वितीय श्रेणी शहरांमध्ये जयपूर, चंदिगड, कोईम्बतूर, सुरत, लुधियाना, इंदूर, अमृतसर, म्हैसूर, नागपूर, विझाग, तर तृतीय श्रेणी शहरांमध्ये पटियाला, भटिंडा, मीरत, जामनगर, यमुनानगर, त्रिची, हसन, कोटा, औरंगाबाद, रोहतक आदींचा समावेश आहे.
‘टीमलीज’च्या ‘बीएफएसआय’ विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख कृष्णेन्दू चॅटर्जी म्हणाले, ‘‘द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील रिटेल कर्जपुरवठा उद्योगाच्या विकसित होत असलेल्या वेगावर प्रकाश टाकतो. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये रोजगार मागणीत २९ टक्क्यांनी झालेल्या वाढीमधून या उद्योगाच्या विकासाला गती देण्यासाठी कुशल व्यावसायिकांची त्वरित गरज दिसून येते. हा कल चालू आर्थिक वर्षातही कायम राहिल, अशी अपेक्षा आहे. वित्तीय संस्थांचा उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये प्रवेश आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या धोरणांना प्राधान्य देण्यावर भर सुरू राहण्याची अपेक्षा आहे.’'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.