Indian Hotels: देशांतर्गत वाढत्या पर्यटनामुळे हॉटेल उद्योग भरभराटीला येत आहे. लोक पर्यटनासाठी जातात तेव्हा हॉटेल्समध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे, हॉटेल्समध्ये मोठमोठ्या मीटिंग्ज, लग्नसोहळे, कार्यक्रम असतात, याशिवाय लोक हॉटेलमध्ये जेवायला जातात.
अशा परिस्थितीत ही हॉटेल्स आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतात. कोरोनामध्ये अडचणीत असलेल्या हॉटेल उद्योगात मोठी वाढ होताना दिसत आहे.
भारत हा धर्म आणि अध्यात्माशी जोडलेला देश आहे. येथे अनेक धार्मिक स्थळे आहेत, जी पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही सर्वाधिक लोकप्रिय आहेत. मात्र, धार्मिक पर्यटनाबरोबरच सुट्टीच्या काळात प्रवासातही मोठी वाढ होत आहे.
धार्मिक प्रवासाव्यतिरिक्त, वीकेंड ट्रिप, रोड ट्रिप किंवा बिझनेस ट्रिपसह प्रवासाचे नवीन मार्ग देशात वेगाने वाढत आहेत.
भारताच्या संघटित हॉटेल उद्योगाने 2023 मध्ये 14,000 नवीन रुम सुरु केल्या आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. या वर्षी, त्यात आणखी 23,000 नवीन रुम सुरु होण्याची शक्यता आहे.
सध्या, भारतात सुमारे 183,000 ब्रँडेड हॉटेल रुम आहेत, ज्या 2027 पर्यंत वाढून 2,50,000 पर्यंत जातील अशी होर्वथ एचटीएल कन्सल्टंट्सने शक्यता वर्तवली आहे. भारतातील वाढत्या पर्यटनामुळे 2023 या आर्थिक वर्षात भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात 60 टक्के वाढ झाली आहे.
या हॉटेल क्षेत्रात वाढ होत असली तरी आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा प्रवाह मंदावला आहे. पर्यटन मंत्रालयाकडून उपलब्ध असलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये भारतात सुमारे 6.19 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटक होते, जे 2019 मध्ये सुमारे 10 दशलक्ष होते. 2022 मध्ये देशांतर्गत पर्यटकांची संख्या 17.31 दशलक्ष होती.
प्रत्यक्षात, देशांतर्गत पर्यटन उद्योग हा अर्थव्यवस्थेचे मुख्य इंजिन म्हणून उदयास आला आहे. परंतु केवळ 2% देशांतर्गत प्रवासी हॉटेल्सची निवड करतात. पर्यटक गेस्ट हाऊसेस किंवा स्वतंत्र कमी खर्चिक हॉटेल्सना प्राधान्य देतात जे संघटित क्षेत्राचा भाग नाहीत.
गेल्या वर्षी, भारताने G20 शिखर परिषद आणि ICC क्रिकेट विश्वचषक या दोन्ही मेगा इव्हेंटचे आयोजन केले होते. ज्यामुळे भारताच्या हॉटेल उद्योगाला मोठी चालना मिळाली. Horwathच्या अहवालानुसार, भारतात प्रति खोलीचा सरासरी दैनंदिन खर्च/दर 7,479 रुपयांपर्यंत वाढला आहे. जो 2019मध्ये 5,684 च्या ADR (Average daily rate) पेक्षा जास्त आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देशांतर्गत हॉटेल उद्योगाच्या एकूण कमाईतील 55% हिस्सा हा लक्झरी हॉटेल रुममधून येतो. यात 34% हिस्सा मिडस्केल विभागांमधून येतो.
गोवा, जयपूर, उदयपूर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या बाजारपेठांमधील कमाईचा वाटा जवळजवळ दुप्पट झाला आहे. 2019 मध्ये 8.5% वरून 2023 मध्ये 16.9% झाला आहे. उदयपूरमधील हॉटेल्समध्ये प्रति रात्र रुमचा सरासरी दर 15,500 रुपये आहे, तर गोव्यातील हॉटेल्सचे दर 10,700 रुपये आहे. मुंबईतील एका रात्रीचा सरासरी दर 10,600 रुपये आहे.
हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया (एचएआय) आणि बेनोरी नॉलेज यांच्या 'व्हिजन 2047: इंडियन हॉटेल इंडस्ट्री' अहवालानुसार, 2022 मध्ये जीडीपीमध्ये हॉटेल उद्योगाचे योगदान 40 अब्ज डॉलर होते आणि 2027 पर्यंत ते 68 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. 2047 पर्यंत ते सुमारे 1000 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय पर्यटन उद्योग क्षेत्रापुढील एक मोठे आव्हान हे आहे की पर्यटन क्षेत्रात मूलभूत आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक आणि स्वच्छता यासारख्या अनेक अडचणी आहेत. गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या पर्यटन क्षेत्रात वाढ केली असली तरी, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताच्या पर्यटन स्थळांबद्दल प्रचार आणि जागरूकता अजूनही दिसत नाही.
विविधतेने नटलेल्या भारतामध्ये पर्यटनासाठी वाव आहे. या ठिकाणची संस्कृती, संगीत, हस्तकला, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य नेहमीच देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करत आले आहे. देशात विविध प्रकारचे पर्यटन झपाट्याने वाढत आहे.
यामध्ये समुद्रकिनारा पर्यटन, हिमालयीन पर्यटन, साहसी पर्यटन, वन्यजीव पर्यटन, पर्यावरण पर्यटन, हेरिटेज पर्यटन, अध्यात्मिक पर्यटन, विवाह स्थळ पर्यटन, क्रीडा पर्यटन, सांस्कृतिक वारसा-पर्यटन यांचा समावेश आहे. पर्यटन क्षेत्रातील आव्हानांवर प्रभावी उपाय केल्यास हा उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होऊ शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.